साई हायस्कूलमध्ये सावित्रीच्या लेकींचीच बाजी, 100% निकालाची परंपरा कायम

सानिया महाडिक प्रथम, तमन्ना पवार द्वितीय, तर अनुष्का धाडवे तृतीय

साई/माणगांव (प्रतिनिधी) : साई विभाग शिक्षण प्रसारक मंडळाच्या लोकमान्य ज्ञानदिप विद्यालय साई या मराठी माध्यमाच्या माध्यमिक विद्यालयाचा इ.10 वी चा निकाल 100% लागला आहे. या शाळेतून 43 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. दरवर्षी कला, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या शाळेची गुणवत्तेतही नेहमी आघाडीवर असते. त्यामुळे निकालाची ही यशस्वी परंपरा कायम ठेवली आहे.

सदरच्या निकालात पहिला क्रमांक सानिया रमेश महाडिक 95.60% व दुसराक्रमांक तमन्ना गणेश पवार 93.60% तर तिसरा क्रमांक अनुष्का मंगेश धाडवे या  सावित्रींच्या लेकींनी प्राप्त केला. यावर्षी  मुलींनी सर्वप्रथम येण्याचा मान मिळवल्याने सर्व पालक व शिक्षक बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. अतिशय ग्रामीण भागातील या शाळेतील विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचे कोचिंग क्लासेस व मार्गदर्शन नसताना केवळ शिक्षकांनी घेतलेल्या मेहनतीमुळे व प्रशासनाच्या सहकार्यामुळे हे यश संपादन केले आहे. गेली अनेक वर्षे हे विद्यालय आपल्या उज्वल यशाची परंपरा कायम ठेवत आलेले आहे.

शाळेच्या या यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष गजानन अधिकारी, उपाध्यक्ष बळीराम लाड, सचिव गणेश पवार, मुख्याध्यापिका सुजाता म्हात्रे, जोशी सर, पाटील मॅडम, अधिकारी सर, सत्वे मॅडम, पवार सर शिक्षकेत्तर कर्मचारी, तसेच परिसरातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. 

Popular posts from this blog