कोरोना रोखण्यास नागरिकांनी सहकार्य करावे! 

माणगांवचे नायब तहसीलदार श्री. भाबड यांचे आवाहन 

पाटणूस/माणगांव (आरती म्हामुणकर) : कोविडच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव वाढत असून माणगांव तालुक्यातील पाटणूस परिसरात दोन महिन्यापूर्वी काही अंशी कोरोनाचे रुग्ण सापडले होते. त्यामुळे पाटणूस परिसरात चिंतेचे वातावरण पसरले होते. परंतु त्यानंतर ग्रामपंचायत पाटणूस परिसरात अनेक निर्बंध लावले. त्यास नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला. शिवाय ग्रामपंचायत पाटणूसच्या प्रयत्नाने ग्रामपंचायत पाटणूस व शिरवली आरोग्य विभाग पाटणूस यांच्या संयुक्त विद्यमाने पाटणूसच्या आरोग्य केंद्रात ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी कोविडची लस उपलब्ध करण्यात आली.

त्याचा अनेक नागरिकांना लाभ झाला. लस देण्याचे काम आज रोजीही चालू असल्याने नागरिक त्याचा लाभ घेत आहेत. लागलीच या लसीचा फायदा होऊन कोरोनाचे रुग्ण कमी झाल्याचे दिसून आले आहे. पाटणूसच्या सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, आरोग्य सेविका, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, मदतनीस, वैद्यकीय अधिकारी यांनी वेळोवेळी नागरिकांना सहकार्य केल्यानेच पाटणूस परिसरात कोरोनाची रुग्ण संख्या आटोक्यात आली. तरीही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन माणगांवचे नायब तहसीलदार भाबड यांनी नागरिकांना कोरोना पासून बचाव करण्यासाठी पाटणूस येथे जनजागृती कर्यक्रमामात मार्गदर्शन केले. 

या कार्यक्रमास मंडळ अधिकारी साहेबराव साबळे, तलाठी सचिन मिसाळ, सरपंच नीलिमा निगडे, उपसरपंच चंद्रकांत गुजर, ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत मोरे, सदस्या दुर्वा कमलेश चव्हाण, कुंडलिका विद्यालयाचे मुख्याध्यापक मोराळे, राजिप शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण राठोड, शिक्षक राजेश जाधव, ग्रामसेवक ठाकूर, अंगणवाडी सेविका व मदतनीस, आरोग्य अधिकारी ऋषिकेश कळसकर, आरोग्यसेवक मधुकर पाटोळे, आरोग्यसेविका ज्योती जाधव, दिपाली निजामपूरकर (स्वयंसेविका) मयूर अडविलकर (स्वयंसेवक) सामाजिक कार्यकर्ते निलेश वांजळे इ. मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.

Popular posts from this blog