पोलिसाला ढकलले, शिवीगाळ केली!
भाजपा उपजिल्हाध्यक्षावर गुन्हा दाखल
रायगड (समीर बामुगडे) : सुधागड तालुक्यातील मौजे झाप येथील ‘स्वागत बीयर शॉप तसेच परमीट बीयर बार’ येथे अवैध दारू विक्री बाबतच्या तक्रार अर्जाची शहानिशा करीत राज्य उत्पादन शुल्क, गुन्हा अन्वेषण शाखा व पाली पोलिस यांनी संयुक्तपणे कारवाई केली.
गुन्हा अन्वेषण शाखेच्या अधिकार्यांना परवाना धारकाने, राज्य उत्पादन शुल्कचे अधिकारी असल्याशिवाय, कारवाई करण्यास विरोध केल्याने संयुक्त कारवाई झाली. या संयुक्त कारवाईत देशी दारू सापडल्याने विभागीय गुन्हा नोंद झाला आहे. राज्य उत्पादन शुल्क अधिक्षकांकडून तयार केलेला अहवाल जिल्हाधिकार्यांना सादर केला जाईल व विषयाच गांभीर्य पाहून दंड, परवाना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे कळते.
शिवाय पाली पोलिस स्टेशनमध्ये, भारतीय दंड विधान कलम ३५३ (लोकसेवकाला त्यांचे कर्तव्य पार पाडण्यापासून धाकाने परावृत्त करण्यासाठी हमला किंवा फौजदारी प्राप्त बलप्रयोग केला) व ५०४ (शांतताभंग घडवून आणण्याच्या उद्देशाने अपमान केला) अंतर्गत भाजपा उपजिल्हाध्यक्ष राजेश मपारा व वैशाली राजेश मपारा यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हे अन्वेषण शाखा अलिबाग पोलिस हवालदार प्रशांत भगवान दबडे हे फिर्यादी आहेत.
सविस्तर माहीती अशी की पोलिस पथक, पंचांसह शासकीय काम करीत असताना आरोपी फिर्यादीच्या अंगावर धावून गेला व शिवीगाळ केली. तसेच दुय्यम निरीक्षक रमेश मारुतीराव चाटे, गणेश किसन घुगे हे कारवाई करीत असताना, सदर कारवाईत सापडलेल्या देशी दारूच्या बाटल्या टेबलावर मांडलेल्या असताना देशी दारूचा बाटल्या आरोपीने फिर्यादी, पोलिस व पंचाच्या अंगावर ढकलून दिल्या.