कर्नाटकच्या अधिकार्‍याची पर्यावरण संवर्धनासाठी रोह्यात धडपड! 

कौतुकास्पद कामगिरीने रोहेकर भारावले

रोहा (रविना मालुसरे) : "वसुदेव कुटुंबकम", म्हणजेच सारे विश्वच आपुले घर, ही उक्ती शब्दशः वास्तवात आणणाऱ्या एका चतुरस्त्र व्यक्तिमत्त्वाची चर्चा सध्या संपूर्ण रोहे परिसरात सुरु आहे. कारण रोह्यात या अगोदर अशी उत्तुंग कामगिरी व्यक्तिशः कोणी केल्याचे ऐकिवात नाही. 

निसर्गावर प्रेम करणारे आपण सर्वच जण आहोत, परंतु त्यांचे संवर्धन करणारे खूप थोडेच लोक समाजात आहेत. अनेकजण स्वतःसाठी, स्वतःच्या कुटुंबियांसाठी किंवा फार तर आपल्या जवळच्या नातेवाईकांसाठी झटणारे भेटतील. परंतु दुसर्‍या राज्यातून येऊन, आपण काही काळ येथे वास्तव्यास आहोत याची जाणीव असताना देखील निस्वार्थी भावनेने व कोणताही गाजावाजा न करता समाजकार्य करणाऱ्या व्यक्तीचे आपण मोठ्या मनाने कौतुक केले पाहिजे. 

समस्त रोहेकरांच्या कौतुकास पात्र ठरलेले एक उत्तुंग व्यक्तिमत्व आहे, श्री. प्रभू रविकुमार कुंटोजी यांचे मूळ गाव आहे कर्नाटक राज्यातील. मागील सहा महिन्यांपासून धाटाव एमआयडीसी मधील युनिकेम लॅबोरेटरीज लिमिटेड या कारखान्यांमध्ये ई.एस. एच.मॅनेजर पदावर ते कार्यरत आहेत. त्यांनी कंपनीच्या कामगारांना ५०० तुळशीची रोपे, १०० आंब्याची व १०० नारळांची रोपे देऊन त्यांचे वृक्षारोपण करून घेतले. त्याचबरोबर त्यांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी ५०० झाडे लावण्याचा संकल्प केलेला आहे. त्यापैकी ३०० झाडांचे वृक्षारोपण आतापर्यंत पूर्ण झाले असून, उर्वरित झाडांचे वृक्षारोपण करण्याची प्रक्रिया सुरू आहे. भुवनेश्वर ते निवी रोड लगत व मोकळ्या जागेत त्यांनी आपल्या कुटुंबियांच्या सहकार्याने हे वृक्षारोपण केले आहे. कोणत्याही शासकीय आदेशाशिवाय आणि विशेषतः प्रसिद्धीविना पर्यावरण संवर्धनाचे काम कुंटोजी करीत आहेत.

रोह्यात येण्याअगोदर श्री. प्रभू कुंटोजी हे गुजरात मधील जे.बी.फार्मासिटिकल या कंपनीमध्ये कार्यरत होते. तेथेही त्यांनी वृक्षसंपदा जोपासण्याचे फार मोठे काम केले आहे. मागील वर्षी अचानक लॉकडाऊन जाहीर झाले आणि अनेक मजुरांचे प्रचंड हाल झाले. अन्न पाण्यावाचून नागरिकांची तडफड  पाहून सर्जनशील कुंटोजी प्रचंड व्यथित झाले. त्यांनी आपल्या पदरमोडीने अनेक गरजवंतांना गृहपयोगी सामानाचे मोफत वितरण केले. त्याचप्रमाणे नागरिकांचे कोरोना पासून रक्षण करण्यासाठी स्वखर्चाने परिसर सॅनिटाइज करून दिला.

निसर्गरम्य रोह्याचा परिसर हा सदाहरित राखण्यासाठी कुंटोजी यांची तळमळ वाखाणण्याजोगी आहे.त्यासाठी ते त्यांच्यापरिने करीत असलेले प्रयत्न पाहून त्यांचे कौतुक आणि आभारही मानावेसे वाटतात. त्याचे हे कार्य हे प्रांतवादाच्या पलिकडील जैवविविधतेचे महत्त्व  अधोरेखित करते. मागील एप्रिल-मे महिन्यात रोहा परिसरात, रोहा वनविभागाच्या निष्क्रियतेमुळे लागलेल्या वणव्यात शेकडो एकर वनक्षेत्र अक्षरशः बेचिराख झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर कुंटोजी यांनी सुरू केलेली ही मोहीम कौतुकास्पद व  आपल्याला अंतर्मुख करणारी आहे. कदाचित पुढील काही वर्षात कोंटोजी कामानिमित्त दुसर्‍या राज्यात जातील मात्र त्यांनी रोहेकरांना दिलेली ही भेट सदोदित आठवणीत राहील.

Popular posts from this blog