रिक्षाचालकांच्या कर्जाचे हप्ते पुढे ढकलावे!
राजे प्रतिष्ठान कामगार सेना पनवेल तालुकाध्यक्ष संतोष आमले यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
पनवेल (प्रतिनिधी) : कोरोनाच्या सावटा खाली गेल्या वर्षा पासून पूर्ण जग जात आहे कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी महाराष्ट्र शासन प्रयत्न करत आहे. लॉकडाऊन हळूहळू उठवण्याचा प्रयत्न सुरु आहे. परंतु अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्यात रिक्षाचालक सुद्धा संकटात सापडला. व्यवसाय नसल्याने अनेक रिक्षा चालकांवर उपासमारीची वेळ आली. कुटूंब चालवायचं कस? या चिंतेत रिक्षाचालक असून त्यात रिक्षावर असलेले बँक फायनान्सचे कर्ज फेडायचे कसे? त्यातच थकीत हप्ते भरण्यासाठी तगादा लावला जातो. व्यवसाय कमी झाल्यामुळे कोरोना काळातील थकीत हप्ते भरायचे कसे? या चिंतेने रिक्षाचालक खचून गेला आहे. कर्जापाई महाराष्ट्रात अनेक रिक्षा चालकांनी आत्महत्या केल्यात. महाराष्ट्र शासनाने केलेली 1500 रुपयांची मदत तोकडी आहे. तरी महाराष्ट्र शासनाने कोरोना काळातील रिक्षावर असलेले बँक फायनान्सचे कर्जाचे हप्ते गेल्या वर्षाप्रमाणे आताही पुढे ढकलण्याचे आदेश द्यावेत. त्यामुळे सध्या रिक्षा चालकांना कर्ज फेडण्यास सोपे जाईल, अशी मागणी राजे प्रतिष्ठान कामगार सेना, महाराष्ट्र राज्य चे पनवेल तालुका अध्यक्ष संतोष शिवदास आमले यांनी मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे केली आहे.