पाटणूस येथील आदिवासी बांधवांना मदतीचा ओघ सुरूच!
पाटणूस/माणगांव (आरती म्हामुणकर) : माणगांव तालुक्यातील अति दुर्गम भागात राहणाऱ्या फणशीदांड व भिरा आदिवासी वाडीतील आदिवासी बांधवांच्या मदतीला पुन्हा एकदा ग्रामपंचायत पाटणूसचे माजी उपसरपंच आंदेश दळवी धावून आले. त्यांच्या प्रयत्नाने रविवार दि. 13 जून 2021 रोजी रुद्रांग चॅरिटेबल ट्रस्ट पुणे यांनी आदिवासी बांधवांना कपडे, लहान मुलांसाठी खाऊ, खेळणी व शालोपयोगी साहित्य वाटप केले.
तसेच त्यांच्या टीममधील सागर रुपनार यांनी स्वतः हजर राहून प्रत्येक आदिवासी कुटुंबियांना साखर, चहा पावडर व अन्य जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. नेहमी प्रमाणे आंदेश दळवी यांनी रुद्रांग चॅरिटेबल ट्रस्टचे सागर व त्यांची टीम यांचे आभार मानले व त्यांना धन्यवाद दिले. लॉकडाऊनमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या आदिवासी बांधवांसाठी विविध संस्थांशी संपर्क करून आदिवासी बांधवांना मदत आणून सध्या आंदेश दळवी हे आदिवासी बांधवांसाठी मदतगार ठरत आहेत.
रुद्रांग चॅरिटेबल ट्रस्ट पुणेची टीम लॉकडाऊनच्या काळात आर्थिक संकटात सापडलेल्या अति दुर्गम भागातील नागरिकांना मदत करण्याचे महान कार्य करीत आहे. त्यामुळे गरीब जनता या टीमच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करीत आहे.