"युवती व महिला संघटनांमध्ये काम केल्यानेच आपण घडत गेलो."
- नामदार आदिती तटकरे
रोहा (रविना मालुसरे) : रायगड जिल्ह्याच्या युवती व महिला संघटनेमध्ये काम केल्यानेच आपली उत्तम जडणघडण झाली अशी प्रांजळ कबुली रायगडच्या पालकमंत्री तथा राज्यमंत्री महाराष्ट्र शासन कुमारी आदितीताई तटकरे यांनी दिली.
सुधागड येथील पालीवाला कॉलेजच्या सभागृहात आयोजित रायगड जिल्हा युवती व महिला राष्ट्रवादी काँग्रेस मेळाव्यात त्या संबोधित करीत होत्या.
दिनांक १९ जून २०२१रोजी सायंकाळी चार वाजता सुरू झालेल्या महिला मेळाव्याची सुरुवात नामदार आदितीताई तटकरे यांच्या शुभ हस्ते दीपप्रज्वलन व देवीच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. कार्यक्रमाच्या संयोजिका गीता पालरेच्या (अध्यक्षा रायगड जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस) व अॕड. सायली दळवी (अध्यक्षा राष्ट्रवादी युवती काँग्रेस रायगड जिल्हा) यांच्याहस्ते आदितीताई तटकरे यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी आदितीताई तटकरे यांनी औपचारिक भाषण न करता युवती व महिलां बरोबर अनौपचारिक संवाद साधला. महिला व युवती म्हणून संघटन करणे खूप कठीण गोष्ट असते, ते सांगताना त्यांनी अनेक उदाहरणे दिली. मात्र या आव्हानांतुन आपल्या प्रखर इच्छाशक्ती द्वारे आपण मार्ग काढून यशस्वी होऊ शकतो हे सुद्धा त्यांनी सोदाहरण पटवून दिले.
पाली व परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असताना सुद्धा जिल्ह्याच्या विविध भागांतून महिला व युवती मोठ्या संख्येने पोहोचल्या त्याबद्दल त्या सर्वांचे कौतुक केले. आगामी काळात सुप्रियाताई सुळे, सुनीलजी तटकरे व अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त महिला व युवती काँग्रेसच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम संपूर्ण रायगड जिल्ह्यात राबविण्यात येणार आहेत.
युवती व महिला पदाधिकारी यांना पक्षाच्या बैठकांमध्ये महत्त्वाचे स्थान दिले जाणार आहे हे सुद्धा त्यांनी स्पष्ट केले
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पक्ष संघटनेसाठी युवती व महिला राष्ट्रवादी कॉंग्रेसने पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी केले .
उपस्थित महिला व युवतींबरोबर मुक्तसंवाद साधून महिला व युवतींच्या अडचणी जाणून घेतल्या. त्याचप्रमाणे विविध विषयांवर त्यांच्या सूचनांवर सखोल चर्चा केली.यावेळी उपस्थित महिला व युवतींनी विविध उपक्रमांबद्दल नामदार आदितीताई तटकरे यांच्या बरोबर मनमोकळेपणाने चर्चा केली.
यानंतर उपस्थित महिला व युवती राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आली.
कार्यक्रमाच्या ठिकाणी कोरोना संबंधित सर्व नियमांचे काटेकोर पालन करण्यात आले होते.