ओबीसी आरक्षण कायम ठेवण्यासाठी माणगांव मुंबई-गोवा हायवेवर भाजपचे राज्य सरकार विरोधी चक्काजाम आंदोलन
माणगांव (प्रमोद जाधव) : महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था मधील ओबीसी आरक्षण रद्द केल्यानंतर त्याचे पडसाद राज्यभर उमटू लागले आहेत. याकरिता राज्य सरकार विरोधात संपूर्ण राज्यभर चक्काजाम आंदोलने करण्यात आली. याचाच एक भाग म्हणून माणगांव शहरात २६ जून रोजी मुंबई गोवा हायवेवर बसस्थानकासमोर सुमारे १ तास चक्का जाम आंदोलन करण्यात आले.
यावेळी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश सचिव रवींद्र मुंढे, दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अॅड. महेश मोहिते, माणगांव तालुकाध्यक्ष संजय (आप्पा) ढवळे, तालुका महिला मोर्चा अध्यक्षा शर्मिला सत्वे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अमित घाग, माणगांव युवा मोर्चा तालुका अध्यक्ष विशाल गलांडे, दक्षिण रायगड मधील सर्व मंडळ अध्यक्षांसह विविध भाजप सेलचे पदाधिकारी व भाजप कार्यकर्ते कोरोना प्रतिबंधात्मक नियम पाळून उपस्थित होते.
अशा प्रकारची चक्का जाम आंदोलने महाराष्ट्रभर लाखो ठिकाणी झाली. मात्र दक्षिण रायगडमध्ये झालेल्या माणगांव मधील चक्का जाम आंदोलनामुळे सुमारे सव्वा तास वाहतूक थांबवून ठेवण्यात आली होती. दरम्यान, अत्यावश्यक सेवेतील वाहनांना कुठल्याही प्रकारचा अडथळा नको अशी भूमिका देखिल आंदोलकांनी घेतल्याने आंदोलकांचे माणगांवमधून कौतुक होत आहे. यावेळी माणगांवमध्ये या सरकारचं करायचं काय? खाली डोके वर पाय? महाविकास आघाडी सरकारचा धिक्कार असो... आघाडी सरकार बिघाडी सरकार... अशा घोषणा आंदोलकांकडून देण्यात येत होत्या.. मात्र सुमारे सव्वा तासानंतर माणगांव पोलीस निरीक्षक अश्वनाथ खेडकर, माणगांव पोलीस ठाणे हेड कॉन्स्टेबल स्वप्निल कदम, पो.ह. गीते यांच्या विनंतीने आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले. त्यावेळी नवनियुक्त भाजप महाराष्ट्र प्रदेश सचिव रवींद्र मुंढे यांनी महाविकास आघाडी सरकारवर घोषणामधून शरसंधान साधले.