निसर्ग सौंदर्याने नटलेल्या तळा येथील वावे धरण धबधब्यावर पर्यटकांना बंदी
तळा (संजय रिकामे) : तळा तालुका डोंगराळ निसर्ग सौंदर्याने नटलेला असल्याने पावसाळी सहल पर्यटकांना आकर्षित करतआहे. मुंबई-गोवा महामार्गावरील इंदापूर मधून १५ कि.मी. पश्चिमेला तळा तालुका हिरवेगार वनश्रीने नटलेला भाग व तळगड किल्ला, वावेधरण धबधबा,वांजळोशी धरण व पन्हेळी (गायमुख) पर्यटकांना मोहीत करते. संपूर्ण महाराष्ट्रात व रायगड जिल्ह्यासह तालुक्यात पहिल्याच मुसळधार पावसामुळे धरणे, नदी, नाले, धबधबे ओसंडून वाहू लागले आहेत. तरूणाईला आकर्षित करणारे वावे धरण धबधबा, पन्हेेेळी येथील दुधाळ पाण्याच्या धबधब्यावर पर्यटकांचे पाय आपोआप वळु लागतात. शनिवारी, रविवारी सुट्टी असल्याने प्रचंड गर्दी केली जात आहे. हिरवा शालू पाघंरुन असलेला परिसर, पक्षांचा मंजुळ स्वर पूर्वेला सह्याद्रीच्या उंच पर्वत रांगा, समोर रायगड किल्ला व तळगड किल्ल्याचे नयनरम्य दृष्य देखील पहायला गडाकडे पाय आपसुकच वळतात. पावसाळी सहल म्हणजे तरूणाईला पर्वणीच आहे. वावेधरणातून फेसाळणारे पाणी अंगावर घेण्यासाठी सकाळ पासूनच पर्यटकांची मोठी गर्दी होते. तर जेवण बनवण्याची देखील सोय आहे. जवळच गाव असल्याने सभोवती चुलीवरच्या भाकऱ्या, मांसाहारी, शाकाहारी जेवण ऑर्डर दिल्यास बनवून मिळते. हिरवे गर्द डोंगर डोंगर दऱ्यातून नाल्यातून खळखळून वाहणारे पाणी निसर्ग सौंदर्य अनेक हौशी पर्यटक आनंद लुटत असताना मोबाईलमध्ये सुष्टी सौंदर्य कैद करतात. परंतु कोरोना विषाणूचा तळा तालुक्यात वाढत चाललेला प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनाकडून धबधब्यावर जाण्यास पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. शनिवार, रविवारी वावे धबधबा पर्यटकांनी हाऊस फुल्ल झालेला असतो अशातच एखादा बाधित रुग्णाच्या संपर्कात येऊन अनेकांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव वावे धबधब्यावर ही बंदी घालण्यातआली आहे तसेच या धबधब्यावर येणाऱ्या पर्यटकांवर कारवाई देखील करण्यात येणार आहे.