रायगड जिल्हा परिषदेच्या वतीने "शिवस्वराज्य दिन" उत्साहाने साजरा
पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांच्या हस्ते "शिवशक राजदंड स्वराज्यगुढी" पूजन, छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक प्रतिमा व छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे अनावरण तसेच मोबाईल लसीकरण व्हॅनचे लोकार्पण संपन्न
अलिबाग (जिमाका) : "शिवस्वराज्य दिना" निमित्त रायगड जिल्हा परिषदेच्या प्रांगणात आज दिनांक 6 जून रोजी पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांच्या हस्ते व जिल्हा परिषद अध्यक्षा योगिता पारधी यांच्या प्रमुख उपस्थितीत "शिवशक राजदंड स्वराज्यगुढी" उभारून व या गुढीचे यथासांग पूजन करून अभिवादन करण्यात आले.
यानंतर जिल्हा परिषदेतील अभ्यागत कक्ष येथे अतिशय सुंदर, प्रेरक अशा छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळ्याच्या प्रतिमेचे तसेच छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे अनावरण त्याचबरोबर मोबाईल लसीकरण व्हॅनचे लोकार्पण पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
यावेळी महिला व बालकल्याण समिती सभापती गीताताई जाधव, कृषी व पशुसंवर्धन सभापती बबन मनवे,विरोधी पक्ष नेते सुरेंद्र म्हात्रे, पक्ष प्रतोद मानसी दळवी,माजी उपाध्यक्ष ॲड. आस्वाद पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन ) नितीन मंडलिक, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) शीतल पुंड, उप मुख्य कार्यकारी अधिकारी, (पाणी व स्वच्छता) ज्ञानदा फणसे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी दत्तात्रय पाथरूट, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी बंकट आर्ले, जिल्हा कृषी विकास अधिकारी लक्ष्मण खुरकुटे आदी जिल्हा परिषदेतील अधिकारी कर्मचारी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
राज्य शासनाने दि. 6 जून हा दिवस "शिवस्वराज्य दिन" म्हणून राज्यभर साजरा करण्याचा निर्णय घेतला असून आज संपूर्ण राज्यात हा सोहळा दिमाखात साजरा केला जात आहे. दि. 6 जून 1674 साली छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडावर शिवराज्याभिषेक झाला होता. या महान दिवसाची प्रेरणादायी आठवण म्हणून दरवर्षी हा दिवस साजरा करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीताने झाली.