कोरोना काळात देहावसन झालेल्या व्यवसाय बंधूंच्या कुटूंबियांना मदतीचा हात
रोहा तालुका मंडप, डीजे, फ्लॉवर, केटरिंग असोसिएशनचा स्तुत्य उपक्रम
रोहा (रविना मालुसरे) : जेव्हा पुढच्या पिढीसाठी कोरोनाचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा कोरोनामुळे बाधित झालेली समाजव्यवस्था दृष्टिपथात पडेल. याच काळात सर्वाधिक परिणाम झाला असेल तर तो लग्नव्यवस्थेशी निगडित व्यवसायांवर!
लग्नासाठी केवळ २५ लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी मिळत असल्यामुळे, हॉल, मंडप, ध्वनिक्षेपक, लाइटिंग, वाजंत्री, छायाचित्रकार, केटरिंग व तत्सम व्यवसाय पुरते अडचणीत आले. आपल्या व्यवसायात लाखोंची गुंतवणूक केलेली ही मंडळी लग्नसराईची वाट पाहत असतात. मात्र मागील दोन वर्षात कोरोनाने यांच्या व्यवसायाचीच वाट लावली आहे.
अशा परिस्थितीत, हे ही दिवस जातील या एकाच आशेवर हे व्यावसायिक तग धरून आहेत. अशातच आपल्या व्यवसाय बंधूंच्या अकाली निधनाने पुन्हा दुःखाचे सावट पसरले.
रोहा तालुका मंडप, डीजे, फ्लॉवर, केटरिंग असोसिएशनचे सभासद असलेले भगवान शेळके (नडवली) व रवींद्र जांबेकर (आमडोशी) यांचे काही दिवसांपूर्वीच निधन झाले. त्यांच्या अकाली निधनाने परिवारावर मोठे संकट कोसळले. रोहा तालुका मंडप, डीजे, फ्लॉवर, केटरिंग असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी त्यांच्या कुटूंबियांस असोसिएशनच्या वतीने पाच हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. याप्रसंगी अध्यक्ष कालिदास भिंगारे, राजू पाटील, सुनील दळवी, सचिन शिंदे, प्रमोद खांडेकर, संतोष घुसळकर, रवि माळी इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
रोहा तालुका मंडप, डीजे, फ्लॉवर, केटरिंग असोसिएशनच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.