देवकुंडाला पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांना परत पाठविण्यासाठी पोलीसांची दमछाक!
सुरक्षेचा उपाय म्हणून पोलीसांनी पर्यटकांना रोखले
पाटणूस/माणगांव (आरती म्हामुणकर) : माणगांव तालुक्यातील पाटणूस येथे देवकुंड पर्यटनाला जाण्यासाठी पर्यटकांनी खूप गर्दी केली होती. परंतु राज्यात मुंबईसह कोकणातील रायगड, रत्नागिरी, ठाणे, पालघर या भागात बुधवार पर्यंत रेड अलर्ट जारी केला आहे. या भागात अति मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिल्याने प्रशासनाने पोलीस दलास सतर्क राहण्याचे आदेश दिले होते. पर्यटक ताम्हिणी घाट, देवकुंड पर्यटन व रायगड जिल्ह्यातील अनेक धोकादायक धबधबे या ठिकाणी गर्दी करण्याची शक्यता असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून पर्यटकांना त्या ठिकाणी जाण्यास अटकाव करण्यात आला होता. तरीही पाटणूस येथील देवकुंड धबधब्याकडे जाण्यासाठी शेकडो पर्यटकांनी पाटणूस येथे गर्दी केली होती परंतु खबरदारीचा उपाय म्हणून पाटणूसच्या जकात नाक्यावर पाटणूस ग्रामपंचायतचे कर्मचारी व माणगांव पोलीस कर्मचारी यांनी पर्यटकांना नाक्यावरच अडवल्याने एकाही पर्यटकाला देकुंडाला जाता आले नाही.
देवकुंड पर्यटनाला जरी शासनाची मान्यता मिळाली असली तरी पर्यटकांची सुरक्षा ही प्रशासनाची जबाबदारी आहे आणि म्हणून हवामान खात्याकडून रायगड जिल्हा बुधवार पर्यंत रेड अलर्ट जाहीर होताच पोलीस दलाकडून ही खबरदारी घेण्यात आली होती. या कामी माणगांव पोलीस निरीक्षक श्री. खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक वडते, पोलीस कॉन्स्टेबल शिंदे यांनी चोख कामगिरी बजावली. दरम्यान, त्यांना ग्रामपंचायत पाटणूसचे कर्मचारी मनोज म्हामुणकर व सुभाष चव्हाण यांनी उत्तम सहकार्य केले.