नागोठणे-चिकणी येथे बेकायदा जुगार क्लब राजरोसपणे सुरू!
नागोठणे येथील बेकायदा जुगार क्लबला पोलीस ठोकतात सलाम?
नवीन गृहमंत्र्यांना हफ्ता कमी पडला का, कितीचा हफ्ता पोहोचतोय?
"प्रहार जनशक्ती" संघटनेचे रायगड जिल्हा सरचिटणीस अॅड. काशिनाथ ठाकूर यांच्याकडून पोलीस अधीक्षकांना जुगार खेळण्याचे निमंत्रण!
रायगड (किशोर केणी) : सध्या अवैध धंद्यांनी रायगड जिल्ह्याला पोखरलेले दिसत आहे. पोलीसांच्या आशिर्वादाने सर्वत्र बेकायदा जुगार क्लब राजरोसपणे सुरू असून यापूर्वीच्या गृहमंत्र्यांना १०० कोटीचा हफ्ता चालू होता, पण सध्याच्या गृहमंत्र्यांना हा हफ्ता पण कमी पडतो का? त्यांना कितीचा हफ्ता चालू आहे? असा संतप्त सवाल प्रहार जनशक्ती संघटनेचे रायगड जिल्हा सरचिटणीस अॅड. काशिनाथ ठाकूर यांनी उपस्थित केला आहे.
यासंदर्भात अॅड. काशिनाथ ठाकूर यांनी जिल्हाधिकारी रायगड, रायगड जिल्हा पोलीस अधिक्षक आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा (L.C.B.) यांच्याकडे वारंवार तक्रारी देऊनही कोणतीही कारवाई केली जात नाही.
सध्या रायगड जिल्ह्यातील नागोठणे-चिकणी येथे बेकायदा जुगार क्लब राजरोसपणे सुरू असून या क्लब मार्फत नागोठणे पोलीसांना "सोन्याचे दिवस" आल्याचे बोलले जात आहे. काही थातुरमातुर पत्रकारांनी देखील येथून स्वतःच्या लायकीप्रमाणे देणगी घेण्यास सुरूवात केल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. तसेच, एका "बोगस" पत्रकाराने तर रायगड जिल्ह्यात अनेक ठिकाणी "नकली पावती बुके" छापून गरीबांसाठी देणगी मागण्याच्या नावाखाली ५ ते १० हजार रूपयांचा धंदा सुरू केल्याचे निदर्शनास आलेले आहे.
दरम्यान, अॅड. काशिनाथ ठाकूर यांनी रायगड पोलीस अधिक्षक यांना जुगार खेळण्याचे निमंत्रण दिले आहे. दि. ८ जून रोजी पोलीस कंट्रोल रूम येथे संपर्क साधून तेथे ड्युटीवर असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांमार्फत पोलीस अधीक्षकांना हे निमंत्रण देण्यात आलेले आहे. तसेच यापूर्वीच्या गृहमंत्र्यांना अवैध धंद्यांमार्फत १०० कोटींचा हफ्ता होता, मग आता सध्याच्या गृहमंत्र्यांना हफ्ता कितीचा पोहोचतोय? असा प्रश्न उपस्थित झालेला आहे.
विशेष म्हणजे नागोठणे-चिकणी येथील जुगार क्लब बंद होणे आवश्यक आहे. बंद न झाल्यास या हद्दीतील जबाबदार पोलीस अधिकारी यांना निलंबीत करण्यात यावे अशी मागणी "प्रहार जनशक्ती" संघटनेचे रायगड जिल्हा सरचिटणीस अॅड. काशिनाथ ठाकूर यांनी केली आहे.