कार्यतत्पर वनकर्मचारी नारायण धुमाळ प्रदिर्घ सेवेनंतर निवृत्त
रोहा (रविना मालुसरे) : वनसंपदेला जोपासण्याचे काम ज्या वनकर्मचाऱ्यांवर असते, ते अनेकदा आपला स्वतःचा जीव धोक्यात घालून आपली सेवा प्रामाणिकपणे बजावीत असतात. अशाच पैकी एक नावाजलेले नाव म्हणजे श्री. नारायण वामन धुमाळ!
रोहा तालुक्यातील यशवंतखार या मूळगावी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन ते १९८३ साली वनविभागाच्या सेवेत दाखल झाले. आपल्या सेवाकाळात महाड, मुरुड, रोहा, भालगाव येथे सेवा बजावताना वनराई बंधारे, वनगुन्हे व इतर अनेक कामांमुळे त्यांनी आपले वरिष्ठ व स्थानिक ग्रामस्थांवर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला.
तळा तालुक्यात ७५ हेक्टर कांदळवनाची लागवड करून वनव्यवस्थापन कमिटी रोवळाच्या माध्यमातून वन व्यवस्थापनाचे उत्कृष्ठ काम त्यांनी केले. रोहा गस्त पथकातील त्यांची कामगिरीही वाखाणण्यासारखी होती. त्यांच्या उत्कृष्ठ सेवा कार्यामुळे त्यांना खालापूर व सुधागड वनविभागाचा कार्यभार देण्यात आला. सामाजिक वनीकरण अंतर्गत राज्य शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेत त्यांनी भरीव कामगिरी केली. पाच लाख रोप निर्मितीच्या कामात त्यांनी योगदान दिले. नुकतेच विहित वयोमानानुसार श्री. नारायण धुमाळ सेवेची ३४ वर्षे पूर्ण करून सेवानिवृत्त झाले. आपल्या सेवा काळात त्यांना देण्यात आलेली प्रत्येक जबाबदारी त्यांनी स्वीकारली व यशस्वीरित्या पार पाडली. ज्या कार्यक्षेत्रात त्यांनी काम केले तेथील लोकांची त्यांनी मने जिंकली. तेथून बदली झाल्यानंतरही त्या लोकांबरोबर त्यांचे ऋणानुबंध कायम राहिले. आजही तेथील लोक त्यांच्याजवळ संपर्क ठेवून आहेत हिच त्यांच्या कामाची पोचपावती म्हणावी लागेल.
त्यांच्या उत्कृष्ठ व यशस्वी सेवापूर्तीचा कार्यक्रम नुकतेच आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपवनसंरक्षक रोहा श्री.आप्पासाहेब निकम, वनक्षेत्रपाल पांढरकामे, वनक्षेत्रपाल सौ. अश्विनी जाधव कोडसे, वनरक्षक आर. आर. अघाव, लवनमजूर खेरटकर इत्यादी वनकर्मचारी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी नारायण धुमाळ यांच्या उत्कृष्ठ सेवेचा गौरव करून त्यांना सन्मानित केले. तर सत्काराच्या उत्तरादाखल बोलताना श्री. नारायण धुमाळ यांनाही अश्रू अनावर झाले. आपण सेवानिवृत्त झालो तरी वनविभागाशी आपले नाते कायम राहणार आहे असे यावेळी त्यांनी भावनिक उदगार काढले. आपल्या सेवापुर्तीचा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल संयोजकांचे आभार मानले.
एस. पी. एफ. जळगावकर साहेब, एस.डी,एफ. श्री.पाटील साहेब व असंख्य वन कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले. तर पाली पंचायत समिती सभापती साक्षी दिघे यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन यशस्वी सेवापुर्ती बद्दल श्री. नारायण धुमाळ यांचे अभिनंदन केले.