माणगांव तालुक्यातील देवकुंड-पाटणूस धबधब्याच्या पर्यटन विकास आराखडा तयार करण्यास शासनाची मान्यता

पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांचा आरोग्य यंत्रणेसह पर्यटन विकासाचाही ध्यास!

पाटणूस/माणगांव (आरती म्हामुणकर) : पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांनी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेच्या बळकटीकरणाचा ध्यास घेतला आहे. त्याचप्रमाणे त्यांनी जिल्ह्यातील पर्यटन विकासाचाही ध्यास घेतला आहे. या दृष्टीने पर्यटनास वाव असणाऱ्या जिल्ह्यातील विविध प्रेक्षणीय स्थळांचा विकास करण्याचा दृष्टीने त्या सर्वतोपरी प्रयत्नशील आहेत. याकरिता त्या सतत शासनाकडे पाठपुरावा करीत आहेत. 

त्यांच्या याच प्रयत्नातून माणगाव तालुक्यातील देवकुंड-पाटणूस धबधब्याच्या पर्यटन विकास आराखडा तयार करण्यास शासनाची नुकतीच मान्यता मिळाली आहे.

कुंडलिका नदीच्या तीन प्रवाहांचा इथे संगम होऊन जवळजवळ 80 फूटांवरून कोसळणारा देवकुंड धबधबा गोड्या पाण्याचा एक सुरेख तलाव निर्माण करतो. नदी, पर्वत आणि सोबतीला रमणीय जंगल असल्यामुळे निसर्गाच्या कुशीत उत्तम वेळ घालवण्यासाठी व ट्रेकिंग, कॅम्पिंगसाठी हे ठिकाण आदर्श असेच आहे. 

देवकुंड धबधबा मुंबईपासून साधारण 170 कि.मी अंतरावर रायगड जिल्ह्यातील भिरा पाटणस नावाच्या गावात आहे. हे गाव ताम्हिणी घाटाजवळ आहे. वर्षभर इथे भेट देण्यास पर्यटकांची मोठी पसंती असली तरी पावसाळ्यात इथला निसर्ग विराट रूप दाखवतो. भिरा गावातून साडेचार किलोमीटरचा ट्रेक आहे. देवकुंड धबधब्याचा ट्रेक तुलनेने सोपा आहे. गावात एक नोंदणी डेस्क आहे, जिथून मार्ग सुरु होतो. आपल्याला वाटाड्या हवा असल्यास तो  इथे उपलब्ध होतो किंवा ठिकठिकाणी लावलेल्या फलकांच्या आधारे आपण स्वतःही जाऊ शकतो. वाटेत पाण्याचे ओढे आणि मोकळी शेतं पाहताना मन प्रसन्न होऊन जातं. जवळपास अर्ध्या तासात आपण भिरा तलावाजवळ पोहोचतो. पुढच्या 45 मिनिटांत दोन ओढे ओलांडत थोड्याशा चढणीवरून जात एका खडकाळ मोकळ्या जागी पोहोचतो. इथे अल्पोपहार, ज्यूस आणि पाणी विकणाऱ्या छोट्या टपऱ्या आहेत. या ठिकाणी थांबून थोडी विश्रांती, आहार घेता येतो.

पुढे खडकाळ दगडांनी जाणारा आणखी एक किलोमीटरचा ट्रेक केला की, आपण धबधब्यावर पोहोचतो आणि खाली रोरावत कोसळणाऱ्या अप्रतिम धबधब्याचे दर्शन होते. उंचीवरून तलावात कोसळताना विविध रंगांचे खेळ करणाऱ्या धबधब्याचे दृश्य पाहण्यासारखे आहे. मित्रपरिवारासोबतच कुटुंबियांसोबतही हा ट्रेक अनुभवता येतो. वाढत्या पर्यटकांसोबतच अर्थात काही अंशी अपघातही होतात, त्यामुळे आता प्रशासनाने काही प्रमाणात निर्बंध आणले आहेत. लॉकडाऊन संपल्यावर जाण्याच्या ठिकाणांची यादी करत असाल, तर देवकुंड धबधब्याचा त्यात नक्की समावेश करावा

माणगांव तालुक्यातील देवकुंड-पाटणूस धबधबा या पर्यटन स्थळाचा विकास होऊन या ठिकाणी अधिकाधिक संख्येने पर्यटक यावेत, यासाठी पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी व्यक्तिश: लक्ष घालून प्रयत्न केले. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून देवकुंड-पाटणूस धबधब्याच्या पर्यटन विकास आराखड्यास अखेर शासनाची मान्यता मिळाली आहे.

Popular posts from this blog