क्लॅरियंट कंपनीच्या परिसराला प्रदूषणाचे ग्रहण!
प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी निष्क्रीय?
स्थानिक नागरिकांची पर्यावरण मंत्रालयाकडे कारवाईची मागणी!
रोहा (समीर बामुगडे) : क्लॅरियंट कंपनीच्या परिसराला प्रदूषणाचे ग्रहण लागलेले असून केमिकलयुक्त दुषित पाण्यामुळे या परिसरातील स्थानिक नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे. ही भयानक समस्या असताना देखील प्रदूषण नियंत्रण मंडळ गप्प का आहे? येथील अधिकारी निष्क्रीय झाले आहेत का? असा प्रश्न येथील नागरिकांसमोर उभा राहिलेला आहे. येथील स्थानिक नागरिक पर्यावरण मंत्रालयाकडे तक्रार करण्याच्या मार्गावर आहेत.
या परिसरात रोठ खूर्द गावाची शेती व लोकवस्ती असून या परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये क्लॅरियंट कंपनीने दुषित सांडपाणी सेडल्यामुळे येथील शेतकऱ्यांचे व नागरिकांचे जीवनमान धोक्यात आलेले आहे.
अद्यापही या कंपनीविरूद्ध कारवाई झाल्याचे दिसत नसल्याने येथे अधिकाऱ्यांनी कंपनीला भेट दिली की कंपनीकडून भेट घेतली? हा प्रश्न अद्यापही गुलदस्त्यातच आहे! कारण यामध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळाची भूमिका महत्वाची असून कंपनीच्या प्रदूषणासंदर्भात कोणतीही कारवाई झाल्याची चिन्हे येथे दिसून आलेली नाहीत. प्रदूषण नियंत्रण मंडळ निष्क्रीय झालेय का? असाही प्रश्न येथे उपस्थित झालेला आहे. परिणामी या कंपनीच्या प्रदूषणासंदर्भात उच्चस्तरिय चौकशी होणे गरजेचे आहे. या कंपनीविरूद्ध पर्यावरण मंत्रालयाने कारवाई करावी अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे.