साई प्राथमिक आरोग्य केंद्राला गळती, रुग्णांचे हाल!
येथे होतेय कोव्हीड लसीकरण, पण दुरूस्तीकडे वर्षभर शासनाचे दुर्लक्ष!
छपराच्या दुरूस्तीसाठी जिल्हा प्रशासन असमर्थ? कर्मचारी करतात छपराची दुरूस्ती!
साई (हरेश मोरे) : माणगांव तालुक्यातील साई प्राथमिक आरोग्य केंद्राला गळती लागली असल्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. त्यामुळे तेथील कर्मचारी पाऊस थांबल्यामुळे छपरावर चढून पावसाचे पाणी पडू नये याकरिता प्लास्टिक टाकत आहेत.
या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात अनेक गावांचा समावेश होत असून प्राथमिक उपचारासाठी अनेक रुग्ण या ठिकाणी येत असतात. काही रुग्णांना याठिकाणी सलाईन सुद्धा लावली जाते. या प्राथमिक आरोग्य केंद्राचे व शौचालयाचे छपर हे निसर्ग चक्रीवादळामध्ये उडाले होते. एक वर्ष पूर्ण झालं तरी प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे.
या ठिकाणी कोविडचे लसीकरण सुद्धा केले जाते. माणगांव तालुक्यातून अनेकजण लस घेणे करिता या ठिकाणी येत आहेत. येथील आरोग्य अधिकारी यांनी दुरुस्ती प्रस्ताव पाठवून सुद्धा दुरुस्ती झाली नाही. कर्मचारी तात्पुरती डागडुजी करीत आहेत. या इमारती कडे लक्ष द्यावे अशी जनतेकडून मागणी होत आहे.