ठेकेदाराकडून विकासकामात कमिशन घेतल्याप्रकरणी खैरेखुर्द सरपंच अपात्र!
कमिशन घेणे सरपंचाला महागात पडले
रायगड (समीर बामुगडे) : ठेकेदाराकडून कामातून कमिशन घेतले. त्याचप्रमाणे आणखी पैसे देत नाही म्हणून काम तात्काळ थांबवावे, अशी नोटीस दिली. तसेच ग्रा.पं.च्या लेटर हेडवर कोणतीही तारीख न टाकता ठेकेदाराचा ठेका रद्द करण्याची नोटीस दिल्याप्रकरणी रोहे तालुक्यातील चणेरा विभागातील खैरेखुर्द ग्रा.पं.च्या महिला थेट सरपंचांना जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी अपात्र ठरविले आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. चणेरा विभागातील चांडगाव येथील रोहा तालुका युवक कॉंग्रेस चिटणीस अनिल काशिनाथ साळावकर यांनी खैरेखुर्द ग्रा.पं.च्या हद्दीतील विविध विकासकामांचा ठेका घेतला असून साळावकर यांची ठेकेदार म्हणून नेमणूक केल्यानंतर त्यांनी महिला सरपंच प्रमिला कोंडे यांचे पती पांडुरंग कोंडे यांचे नावे दिलेला धनादेश ४९ हजार रूपये किंमतीचा आरडीसीसी चणेरा शाखेतून वटवला. त्यानंतर इतर कामांच्या बाबतीत करारनामे झाल्यानंतर कामे पूर्ण झाली आहेत व जी कामे चालू आहेत त्या कामांची अनामत रक्कम व बिलांची रक्कम मिळणेकामी ठेकेदाराने मागणी केली. जवळपास १० लाखांची कामे केल्यानंतर ठेकेदार साळावकर याला २ लाख ६३ हज़ार रूपये दिले. त्यांनी पुर्ण बिल अदा करण्याची विनंती केली असे असताना संबंधित ठेकेदाराला सरपंचांनी ठेका रद्द करण्यात येणार आहे, अशी नोटीस दिली. या संदर्भात ठेकेदार साळावकर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केल्यानंतर जिल्हाधिकारी निधी चौधरी यांचे न्यायालयासमोर अॅड. महेश ठाकूर व सौ. श्रद्धा महेश ठाकूर यांनी युक्तीवाद केले. दोन्ही पक्षकरांच्या युक्तीवादानंतर खैरखुर्द ग्रा.पं.सरपंच सौ. प्रमिला कोंडे या सरपंच पदास अपात्र असल्याचा निर्णय जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिला. जिल्ह्यात थेट सरपंच अपात्र होण्याची ही पहिलीच घटना असून न्यायालयाच्या या निकालाने राजकीय वर्तळात खळबळ उडाली आहे.