तुरीचे उत्पादन वाढविण्यासाठी कृषी विभागाचा प्रोत्साहनपर उपक्रम!
मालसईसह रोहा तालुक्यात विविध ठिकाणी तूर बियाणे वाटप कार्यक्रम
रोहा (रविना मालुसरे) : भारतात सर्वाधिक खाल्ला जाणारा अन्नपदार्थ म्हणजे खिचडी भात! गरिबांपासून ते श्रीमंतांपर्यंत हा पदार्थ चवीने खाल्ला जातो. खिचडी बनविताना तूरडाळ हवीच. मात्र काही वर्षांपासून तूरडाळीचे बाजारातील दर पाहता गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. तूरडाळीच्या वाढत्या किंमतीमुळे सरकारवर चोहोबाजूने टिका होत असते. एकेकाळचा तूरडाळीचा प्रमुख निर्यातदार देश असलेल्या आपल्या भारत देशावर तुरडाळ आयात करण्याची नामुष्की ओढवली आहे.
महाराष्ट्राबद्दल बोलायचे झाल्यास देशात सर्वाधिक तुरीचे उत्पादन महाराष्ट्रात होते. मागील काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील तूर उत्पादक क्षेत्रात दुष्काळ पडला. त्यामुळे तुरीचे उत्पादन अचानक घटले.पुढे तुरीचे उत्पादन होत नाही, म्हणून शेतकऱ्यांनी तुर लागवडीकडे दुर्लक्ष केले. सहाजिकच त्याचे दूरगामी परिणाम झाले. जणूकाही"तुरीनेच आपल्या हातावर तुरी दिल्या." तूरडाळीचे भाव गगनाला भिडले. तुरडाळ हा विषय गल्लीपासून दिल्लीपर्यंत चर्चिला गेला. अखेर या विषयावर सरकारने सखोल अभ्यास करून काही मार्गदर्शक तत्त्वे निश्चित केली.
त्या अनुषंगाने डाळींच्या उत्पादनात स्वयंपूर्ण होण्यासाठी सरकारने खरीप हंगाम २०२१ साठी नवे धोरण निश्चित केले. त्यानुसार तूर, मूग आणि उडीद डाळींच्या लागवडीचे क्षेत्र आणि उत्पादकता दोन्ही वाढविण्यासाठी एक सविस्तर योजना आखली. या धोरणांतर्गत उत्तम पीक देणाऱ्या जातींची बियाणे शेतकऱ्यांना मोफत वाटप करून शेतकऱ्यांनी आंतरपीक अथवा मुख्य पीक म्हणून डाळींची लागवड करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात तेरा लाख एकाव्वान हजार सातशे दहा छोटे पिशव्या प्रमाणित तूर बियाणे शेतकऱ्यांना मोफत वितरीत केले जाणार आहे. राज्याच्या यंत्रणांद्वारे जिल्हास्तर, जिल्हा स्तरावरून तालुकास्त, तालुका स्तरावरुन गावागावांत हे बियाणे शेतकऱ्यांना मोफत वितरीत करण्याचा शासनाने कार्यक्रम आखलेला आहे.
रोहा तालुक्यात तालुका कृषी अधिकारी श्री. कुमार जाधव यांचे नेतृत्वाखाली शेतकऱ्यांना तुरीचे बियाणे वितरित करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. यासाठी तालुक्याच्या विविध भागात दि.२१ जुन ते १ जुलै या कालावधीत कृषी संजीवनी मोहिमे अंतर्गत शेतकऱ्यांना बियाणे वितरणाचे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत.
आज दिनांक २३ जून २०२१ रोजी मालसई, ता. रोहा येथील श्री विठ्ठल मंदिरात रोहा कृषी विभागाच्यावतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी रोहा कृषी विभागाच्यावतीने लाभार्थी शेतकऱ्यांना तुरीचे बियाणे मोफत वितरित करण्यात आले.
रोहा तालुका कृषी अधिकारी श्री. कुमार जाधव यांचे मार्गदर्शनाखाली कृषी मंडळ अधिकारी श्री.सुतार, कृषी पर्यवेक्षक श्री. दिगंबर साळे, कृषि सहाय्यक कु. पल्लवी उबाळे यांनी बियाणे वितरित केले. त्याचप्रमाणे जमिन आरोग्य पत्रिकेनुसार खतांचा संतुलित वापर, युरिया ब्रिकेटस खताचा वापर, कृषिक अॕपचा सुयोग्य वापर इत्यादी विषयांवर शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन केले.
यावेळी गावातील लोकप्रतिनीधी, प्रतिष्ठीत नागरिक व लाभार्थी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कृषी संजीवनी कार्यक्रमांतर्गत वाटप तूर बियाणे कृषीक्षेत्रासाठी मैलाचा दगड ठरणार आहे. या विशेष कार्यक्रमामुळे तूरडाळीची उत्पादकता वाढणार असून डाळींच्या क्षेत्रात भारत आत्मनिर्भर होण्यास हातभार लागणार आहे.