तळा तालुक्यात "जागतिक योग दिवस" उत्साहात साजरा
तळा (संजय रिकामे) : तळा तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने देशमुख हाॅल बाजारपेठ येथे “जागतिक योग दिवस” चे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी भाजपा माजी तालुका अध्यक्ष कैलास पायगुडे, गिरणे ग्रामपंचायत सरपंच सौ. ज्योती पायगुडे, शहर अध्यक्ष सुधीर तळकर, डाॅ. सतिश वडके, अॅड. रातवडकर, पत्रकार संजय रिकामे, रितेश मुंढे, गितेश मेकडे, श्री.भागवत, श्री.तळकर आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना डॉ. वडके यांनी “मानसोपचार आणि योग” याचे महत्व समजावून देऊन आनंदी राहण्यासोबत तणावविरहित जीवनासाठी योग किती आवश्यक आहे, याबाबत सविस्तर माहिती दिली. मानसिक आजारापासून दूर राहण्यासाठी नियमित योग सर्वांनी करावा, असे त्यांनी आवर्जून सांगितले भारतीय प्राचीन संस्कृती, परंपरा यांमध्ये योग, योगासने, योगसाधना यांना अनन्य साधारण महत्त्व आहे. अगदी प्राचीन काळापासून ऋषीमुनी, साधुसंत यांनी वेळोवेळी योगाचे महत्त्व, त्याचे फायदे आणि त्याची गरज पटवून दिलेली आहे. आजच्या काळातील धकाधकीच्या जीवनात योगाच्या माध्यमातून आपण आपले शरीर तर तंदरुस्त ठेवू शकतो; शिवाय मनावरही चांगले संस्कार करू शकतो. तन आणि मन यांचा एकत्रित व्यायाम म्हणजे योग, असे म्हणता येईल. भारतातील ही योग संस्कृती जागतिक पातळीवर बहुतांश देशांनी स्वीकारली असून योगासनांचे लाभ त्यांनीही मोठ्या प्रमाणावर अनुभवले आहेत. जगभरातील देशांनी केवळ योग स्वीकारला नाही, तर त्याचा प्रचार आणि प्रसारही केला. आताच्या घडीला संपूर्ण जगावर करोनाचे सावट असताना योग दिनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. शक्य असलेल्या प्रत्येकाने योगाचा अंतर्भाव आपल्या दैनंदिन जीवनात नक्कीच करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
योग प्रशिक्षक श्री. तळकर आणि श्री. भागवत यांनी उपस्थितांकडून योग प्रात्यक्षिक करून घेतले तसेच उपस्थित सर्वांनी योग करण्याचा संकल्पही केला. शेवटी अॅड. रातवडकर यांनी सर्वांचे आभार मानले.