कुंडलिका विद्यालय पाटणूस व रा. जि. प. शाळा पाटणूस यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण
पाटणूस/माणगांव (आरती म्हामुणकर) : माणगांव तालुक्यातील कुंडलिका विद्यालय पाटणूसचे प्रांगण व रा. जि. प. शाळा पाटणूस प्रांगण परिसरात शिक्षक वर्गाकडून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्ष लागवड करण्यात आली. वृक्ष लागवड करीत असताना वड, पिंपळ, उंबर याच वृक्षांचीच निवड करण्यात आली.
सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने नागरिकांना ऑक्सिजनची उणीव भासत आहे. परंतु आपल्या परिसरात वड, पिंपळ, उंबर या सारखी 100 टक्के ऑक्सिजन देणारी झाडे लावली तर नागरिकांना ऑक्सिजन ची समस्या भेडसावणार नाही व भरपूर प्रमाणात ऑक्सिजन मिळाल्याने नागरिकांचे आरोग्यही चांगले राहील म्हणून आम्ही या वृक्षांची निवड केली आहे असे कुंडलिका विद्यालयाचे मुख्याध्यापक मोराळे यांनी सांगितले.
आमची रा. जि. प. शाळा ज्या ठिकाणी आहे त्याच्या शेजारी वड व पिंपळाची झाडे आहेत त्यामुळे आमच्या शाळेत शिकणाऱ्या मुलांना या झाडांपासून भरपूर प्रमाणात ऑक्सिजन मिळते त्यामुळे आमचे व आमच्या विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले राहते असा आमचा आता पर्यंतचा अनुभव आहे असे रा. जि. प. शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण राठोड यांनी सांगितले. जागतिक पर्यावरण कार्यक्रमात कुंडलिका विद्यालयाचे मुख्याध्यापक मोराळे राजिप शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण राठोड, शिक्षक संदीप उघडा, प्रवीण राठोड, बंडगर, राजेश जाधव, शिक्षिका घाडगे व पाटील यांनी सहभाग घेतला.