तलाठी ‘जनसेवक’ आहेत की मालक?

रोहा (समीर बामुगडे) : गायरान जमिनीचा सातबारा मागण्यासाठी गेलेल्या एका सजग नागरिकाला तलाठ्याने आपला सरकारी खाक्या दाखवला.  दिवसेंदिवस सुधागड तालुक्यात गायरान जमिनी हडप करण्याचे प्रमाण वाढले असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी येत आहेत. 

या तक्रारींच्या अनुषंगाने गायरान जमीनींचा 7/12 मागण्यासाठी रूपेश दीपक दंत हा युवक मंडल अधिकारी कार्यालयात गेला होता. तलाठी विमल घोळवे यांना भेटायचे आहे,  त्या कुठे आहेत? अशी चौकशी योगिता टवले – तलाठी सजा भार्जे यांच्याकडे केली असता, ‘मला काय सांगून गेल्या आहेत का? कोण कुठे जातो हे बघायला आम्ही येथे बसलोत का?’ अशी उत्तरे देण्यात आली. 

या दोन तलाठ्यांत वाद असून त्यांच्या वादात शेतकरी, सामान्य माणूस भरडला जातो असे  ग्रामस्थांचे म्हणणे आहे.  नागरिकांसोबत सौजन्याने वागावे हे सरकारी कर्मचार्‍याचे कर्तव्य आहे व त्याचाच विसर या तलाठ्याला पडलेला दिसतो.  

या कार्यालयात माहिती अधिकाराचा फलक नाही, अभ्यागत भेट वही उपलब्ध नाही. येथे सहाय्यक जनमाहीती अधिकारी किंवा जनमाहिती अधिकार्‍याचा संपर्क क्रमांक दर्शनी भागात लावला तर नागरिकांना चौकशी करायची गरजच पडणार नाही. परंतु आपण कायद्याच पालन करायच नाही, कर्तव्यात कसूर करायची आणि नागरिकांवर उगाचच डाफरायच असा उद्योग महसूल कर्मचार्‍यांनी चालवला आहे.  याबाबत नागरिकांनी वारंवार तहसीलदारांकडे तक्रार करूनही तलाठी काही सुधरायच नाव घेत नाहीत.  हे असच सुरू राहिल तर आम्हा शेतकर्‍यांची कामे कशी होणार? असा तक्रारीचा सुर नागरिकांनी लावला आहे.  संबंधित तलाठ्यावर कारवाई करण्याची तहसिलदार हिम्मत दाखवणार का? या प्रश्नाची सर्वत्र चर्चा आहे.  तसेच नागरिकांच्या चौकशीचा त्रास होत असेल तर कार्यालयाच्या दर्शनी भागात संबंधित जनमाहिती अधिकार्‍याचा संपर्क क्रमांक लावावा, जेणेकरून नागरिकांची अडचण दूर होईल. 

भारतीय दंड संहिता, कलम 21 प्रमाणे प्रत्येक शासकीय अधिकारी व कर्मचारी हा प्रथमत: लोकसेवक असतो. प्रत्येक शासकीय कर्मचारी लोकांचा सेवक आहे. या देशातील गरीब व्यक्तीसुद्धा या देशाचा मालक आहे.  हे कलम व कर्तव्य तलाठ्यांना अवगत नाही का? 

– गौरव म्हात्रे, माहिती अधिकार प्रचारक 

Popular posts from this blog