एन.डी.स्टुडिओला भीषण आग, सुदैवाने जीवीतहानी नाही
कर्जत (प्रतिनिधी) : खालापूर तालुक्यातील चौक येथील प्रसिद्ध एन.डी.स्टुडिओला आज दुपारी भीषण आग लागली. ‘जोधा अकबर’ फायबर सेट येथे ही आग लागली असून एन.डी. स्टुडिओचे यामध्ये मोठे नुकसान झाले आहे.
दुपारी साडे बाराच्या सुमारास ही आग लागली. ही आग प्रचंड होती की आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोळ या परिसरात पहायला मिळत होते. एनडी स्टुडिओतील जोधा अकबर सेटजवळील फायबर मूर्ती गोडाऊन व फायबर सेट येथे ही आग लागली.
या घटनेची माहिती मिळताच खालापूरचे तहसिलदार इरेश चप्पलवार, पोलीस निरीक्षक विभूते व संबंधित यंत्रणा व फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळावर दाखल झाल्या. अत्यंत शर्थीच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आली. या आगीत प्रचंड आर्थिक हानी झाली असून जीवितहानी मात्र झालेली नसल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, या आगीत स्टुडिओचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली? याचे कारण अद्याप समजलेले नाही.