तौत्के चक्रीवादळाच्या सावटामुळे सोमवारी तळा बाजारपेठ बंद

तळा (संजय रिकामे) : रायगड जिल्ह्याच्या किनारपट्टीवर दि. १६ ते १७ मे रोजी तौत्के चक्रीवादळ येत असल्याचा इशारा हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. सदर कालावधीत वाऱ्याचा वेग जास्त असून मुसळधार पावसाची शक्यता देखील वर्तविण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर तळा नगरपंचायतीने सोमवारी तळा बाजारपेठ बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या कालावधीत घ्यावयाच्या काळजी बाबतही आवाहन केले आहे. ज्यामध्ये नागरिकांनी शक्यतो घरामध्येच थांबावे, आपले पशुधन तसेच पाळीव प्राणी आधीच सुरक्षित स्थळी हलवावे, किमान तीन दिवस पुरतील असे खाद्य, सुका मेवा जवळ ठेवावा, वादळामुळे विजेचे खांब व तारा पडण्याची शक्यता असल्याने आशा वस्तूंपासून लांब रहावे, तसेच मदत आवश्यक असल्यास नगरपंचायत व तहसील कार्यालयाशी तात्काळ संपर्क साधावे असे आवाहन करण्यात आले आहे. गेल्या वर्षी आलेल्या निसर्ग चक्रीवादळाचा रायगड जिल्ह्याला मोठा फटका बसला होता. त्यातच आता तौत्के चक्री वादळाची शक्यता वर्तविण्यात आल्याने तालुक्यातील नागरिकांच्या मनात पुन्हा धडकी भरली आहे. चक्रीवादळात नुकसान रोखण्यासाठी नगरपंचायतीने वरील सूचना केल्याअसून सोमवारी तळा बाजारपेठ बंद ठेवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

Comments

Popular posts from this blog