"यूट्यूब चॅनल" आणि "मिडीया" याबाबत संभ्रम!
सोशल मिडीयाच्या नावावर अनेक बोगस पत्रकारांची शायनिंग!
"यूट्यूब चॅनल" हा सोशल मिडीयाचाच एक भाग आहे!
रायगड (प्रतिनिधी) : सध्या सर्वत्र अनेक नवीन-नवीन थातुरमातुर पत्रकार उदयास येऊ लागले आहेत. त्यामध्येच स्वतःला "टीव्ही चॅनलचा पत्रकार" असे म्हणवून घेणारे यूट्यूब चॅनलचे बोगस पत्रकार (सोशल मिडीयाचे प्रतिनिधी) हे तर जास्तच हवेत उडत असल्याचे दिसत आहे. यूट्यूब चॅनलच्या नोंदणी करिता भारत देशात अद्यापही कोणताच कायदा निघालेला नाही. वास्तविकता पाहता "यूट्यूब चॅनल" आणि "मिडीया"चा काहीच संबंध नाही! कारण ज्या प्रकारे "व्हाट्स अप, फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्वीटर" हे सोशल मिडीया आहे, अगदी त्याचप्रमाणे "यूट्यूब" हेदेखील सोशल मिडीयाच आहे.
विशेष म्हणजे यूट्यूब चॅनलच्या रजिस्ट्रेशन संदर्भात आजपर्यंत भारत देशात कोणताही कायदा निघालेला नाही. त्यामुळे यूट्यूब चॅनलमध्ये काम करणारे प्रतिनिधी हे स्वतःला कायद्याने मिडीयाचा पत्रकार म्हणू शकत नाहीत.
यूट्यूब चॅनलला आर.एन.आय. नंबर असतो का?
सध्या सर्वत्र एक अफवा पसरलीय की, यूट्यूब चॅनलची नोंदणी केल्यावर आर.एन.आय. नोंदणी (रजिस्ट्रेशन) क्रमांक मिळतो! मात्र... ज्यांनी ही अफवा पसरवलीय ते फक्त मूर्खच नाहीत तर महामूर्ख आहेत! असेच म्हणावे लागेल. कारण त्या महामूर्खांना एवढे पण कळत नाही की, आर.एन.आय. चा अर्थ "रजिस्ट्रेशन ऑफ न्यूजपेपर्स फॉर इंडिया (R.N.I.)" असा आहे आणि ते फक्त दैनिक, साप्ताहिक आणि पाक्षीक वृत्तपत्र नोंदणीसाठीच आहे. अर्थात, आर.एन.आय. रजिस्ट्रेशन आणि यूट्यूब चॅनलचा कोणत्याही प्रकारचा संबंध नाही.
त्यामुळेच यूट्यूब चॅनलमध्ये काम करणारे स्वतःला पत्रकार (मिडीया) म्हणू शकत नाहीत. कारण यूट्यूब चॅनल हे "सोशल मिडीया" आहे. पण तरीही काही भामट्या व बोगस पत्रकारांनी स्वतःला मिडीयाचा व टीव्ही चॅनलचा पत्रकार समजून फुकटची शायनिंग मारायला सुरूवात केल्याचे दिसून येत आहे. या बोगस पत्रकारांनी अनेक ठिकाणी शासकीय अधिकाऱ्यांना दमदाटी करणे, स्वतः मोठा पत्रकार असल्याचे सांगून पोलीसांसमोर बढाया मारणे, व्यावसायिकांना घाबरवून त्यांच्याकडून पैसे उकळणे, राजकीय पुढाऱ्यांना घाबरवून पैसे लुबाडणे यांसारखे उपद्व्याप सुरू ठेवले आहेत. परिणामी अशा या बोगस पत्रकारांना चाप बसणे गरजेचे आहे. सध्या सर्वसामान्य नागरिकांना कायदे आणि नियम माहिती नसल्याने ते यूट्यूबच्या पत्रकारांनाही ओरिजनल पत्रकार समजून घाबरू लागले आहेत. परंतु त्यांनी घाबरून न जाता दमदाटी, ब्लॅकमेलिंग करणाऱ्या अशा बोगस पत्रकारांविरुद्ध प्रथम स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविणे गरजेचे आहे.