लॉकडाऊन काळात रोहा पोलीसांची चोख कामगिरी
रोहा (रविना मालुसरे) : कोरोनाचा संसर्ग वाढत असताना त्याला रोखण्याचा सर्वात प्रभावी एकमेव उपाय म्हणजे लॉकडाउन! शासनाने जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे लॉकडाऊन कार्यक्रम सगळीकडे राबविण्यात येत आहे. जनतेने तो नाईलाजाने का होईना पण स्वीकारलेला आहे. मात्र या काळात नागरिकांनी घराबाहेर पडू नये, बाजारात अनावश्यक गर्दी करू नये व कोरोनाचा संसर्ग वाढेल अशी कोणतीही कृती घडू नये, यासाठी पोलीस प्रशासन दक्ष झाले आहे. रोह्यात लॉकडाऊनची आंमलबजावणी यशस्वी होताना दिसत आहे. त्याचे खरे श्रेय हे रोहा पोलिसांचे आहे. मे महिन्याच्या दुपारी पारा पस्तीस अंशाच्या पुढे गेलेला असताना, रस्त्यावरील डांबर वितळत असताना, अशा रणरणत्या उन्हात उभे राहून प्रत्येक वाहन चालकावर लक्ष ठेवण्याचे काम रोहा पोलीस करीत आहेत.
आज दिनांक ३ मे रोजी रोह्याचे पोलीस निरीक्षक श्री. नामदेव बंडगर हे रोहा बसस्थानकासमोरील रस्त्यावर मधोमध उभे राहून अनावश्यक कारणास्तव बाहेर पडलेल्या नागरिकांना समज देत होते. आपले वरिष्ठ जेव्हा एखाद्या कामात स्वतःला झोकून देतात तेव्हा सहाजिकच सहकारी कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढते. कोरोनाच्या काळात पोलीसांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे.रोह्याचे पोलीस निरीक्षक श्री. नामदेव बंडगर व त्यांच्या सहकाऱ्यांच्या कर्तव्यदक्षतेमुळे रोह्यातील लॉकडाऊन अत्यंत यशस्वीपणे राबविला जात आहे.