तळा तालुक्यात मुसळधार पावसासह सोसाट्याचा वारा
सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही
तळा (संजय रिकामे) : रायगड जिल्ह्याला मुसळधार पावसासह चक्रीवादळाचा तडाखा बसणार असल्याचा ईशारा हवामान खात्याकडून देण्यात आला होता. हवामान खात्याने वर्तविल्याप्रमाणे चक्रीवादळाचा प्रभाव मध्यरात्रीपासून जाणवू लागला. तळा तालुक्यात रविवारी मध्य रात्रीपासून मुसळधार पावसाळा सुरुवात झाली. मुसळधार पावसासह सोसाट्याचा वारा देखील सुटला होता. तळा तालुक्यात एकूण सरासरी २१ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. यामुळे तालुक्यातील २३ घरांचे अंशतः नुकसान झालेले असून १ घराचे पूर्णतः नुकसान झाले आहे. तसेच काही ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना देखील घडल्या आहेत. या तुरळक घटना सोडल्या तर सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तालुक्यातील समुद्र किनारी राहणाऱ्या ३६ कुटुंबातील १३५ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. गेल्या वर्षी आलेल्या निसर्ग चक्रीवादळात नागरिकांची घरे जमिनदोस्त झाली होती. बागबागायतींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. तसेच अन्न धान्य देखील मोठ्या प्रमाणावर भिजले होते. यावर्षी आलेल्या चक्रीवादळामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले नसले तरी उन्हाळी भात पीक घेणाऱ्या बळीराजाचे मात्र त्याच्या मोत्याप्रमाणे हातातोंडाशी आलेल्या पिकाचे नुकसान झालेले आहे. चक्रीवादळामुळे महावितरण विभागाचे कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नसले तरी सुरक्षेच्या कारणास्तव तालुक्यातील वीज पुरवठा बंद ठेवण्यात आला आहे. नगरपंचायत,पोलीस व तहसील प्रशासनाकडून तालुक्यातील घडामोडींवर लक्ष ठेवले जात आहे. तसेच कोणीही विनाकारण घराबाहेर पडू नये असे आवाहन देखील करण्यात येत आहे.