वनसंपदेची खुलेआम लूट, वनविभागाचे अर्थपूर्ण दूर्लक्ष!
रायगड (समीर बामुगडे) : माणखोरे, कळंब, नागशेत या पट्ट्यातील जंगलातून आयुर्वेदिक औषधांच्या नावाने वनसंपदेची खुलेआम लूट सुरू आहे. सुधागड तालुका हा घाटमाथा व सह्याद्रीच्या डोंगररांगा यांना लागून आहे. हा भाग दुर्मिळ वनऔषधिंसाठी प्रसिद्ध असून अशीच लूट होत राहिली तर येथील दुर्मिळ वनस्पती नष्ट होतील.
या जंगलात फिरणारे आदिवासी, ट्रेकर्स व भटक्यांकडून अशी माहिती मिळते की रगतरोडा (स्थानिक नाव) झाडाच्या साली काढून नेल्या आहेत, गुंजाच्या पाल्यासाठी झुडपे ओरबाडली आहेत, जंगलात नासधूस सुरू आहे. स्थानिक आदिवासी बांधवांच्या खांद्यावर बंदूक ठेवून, ही दुर्मिळ वनसंपदा नष्ट करण्याचा कार्यक्रम सुरू आहे. काही आदिवासी बांधव थोड्याफार मिळणार्या पैशाला भुललेले दिसतात, परंतु ही वनसंपदाच नष्ट झाली, तर भविष्यात त्यांचा जीवनमरणाचा प्रश्न उभा राहील याची त्यांना कल्पनाच नाही.
एखादा कारविचा भारा नेणार्या शेतकर्याला पकडण्यात तत्परता दाखवणार्या वनविभागाचे इतक्या मोठ्या लुटीच्या कार्यक्रमाकडे दुर्लक्ष कसे? असा स्थानिकांचा प्रश्न आहे. जंगलातून ट्रकने वाहून नेत असलेली वनसंपदा वनविभागला दिसत नाही की त्यांनी डोळे मिटून घेतलेत? वनविभागाने गावोगावी नेमलेल्या समित्या तर यात गुंतल्या नाहीत ना? असे एक ना अनेक सवाल जनता विचारात आहे. वनविभागाने असेच दुर्लक्ष केले तर भविष्यात ‘एक होते जंगल’ असे म्हणण्याची पाळी आपल्यावर येईल.
स्थानिक आदिवासींना ते गोळा करून विकत असलेल्या वनस्पतींची किंमत माहीत नाही. या वनस्पती कवडीमोल किमतीने विकत घेवून, मनाला वाटेल त्या भावाला विकून नफा कमावण्याचा धंदा काही व्यापारी करत आहेत. शेतकर्याने एखादं लाकूड तोडलं, तर त्याला कायद्याचा धाक दाखवणारा वनविभाग, या व्यापर्यांवर कडक कारवाई करण्याची हिम्मत दाखवील का? ही सार्वजनिक संपत्ती असून वनविभागाने याबाबतीत लक्ष घातलं नाही, तर पर्यावरणाची काळजी असणारे आम्ही सारे एकत्र येवून लूट करणारे व्यापारी व धृतराष्ट्र बनलेला वनविभाग यांच्या विरोधात जनआंदोलन उभारू व लढा देवू इतकं मात्र नक्की.
- विनायक शिंदे (पर्यावरण प्रेमी)