तळा शहरात भरवस्तीत तरुणीचा विनयभंग
कारवाईच्या भीतीने आरोपीचे पलायन
तळा (संजय रिकामे) : तळा शहरातील १८ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. शहरातील मेठ मोहल्ला येथे ही मुलगी वाढदिवसाला तिच्या मैत्रिणीकडे गेली होती. तिच्यावर पारध ठेऊन असलेल्या आरोपी शोएब नौशाद खाचे याने तिला तळा पोस्ट ऑफिसजवळ आल्यावर गाठले आणि शिवीगाळ करू लागला. आरोपी शोएबने तिच्या कानाखालीही लगावली. हा प्रकार घडल्यावर तिने तिच्याजवळ असलेल्या मोबाईलवरून घरच्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण आरोपी शोएब खाचेने तिच्या जवळचा मोबाईल हिसकावून फेकून दिला. आणि त्याने त्या मुलीचे वाईट उद्देशाने हात पकडले व तिला स्वतःभोवती गोलगोल फिरऊन भिरकावून दिले आणि नंतर तिला वाईट उद्देशाने आलिंगन घातले. हा प्रकार सोबत असलेल्या तिच्या मैत्रिणीने बघितला आणि त्याला अडवण्याचा प्रयत्न केला तर आरोपी शोएबने तिला देखील धमक्या देऊन शिवीगाळ केली. याआधी देखील तळा पोलीस ठाण्यात आरोपी शोएब नौशाद खाचे याच्या वारंवार तोंडी शेकडो तक्रारी येत होत्या, पण आरोपीच्या दहशतीने कोणी लेखी तक्रार दिली नव्हती. पण आता मात्र या तरुणीने मोठे धाडस करून तक्रार दाखल केल्याने कारवाईच्या भीतीने आरोपीने पलायन केले आहे. प्रत्येक अन्यायग्रस्त मुलींनी अशा वेळेस न डगमगता आणि कोणतीही भीती न बाळगता असा प्रकार घडला तर त्यांनी थेट पोलिसांशी संपर्क साधावा म्हणजे अशा नराधमांना चाप बसेल असे आवाहन तळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गेंगजे यांनी केले आहे. आरोपी शोएब खाचे विरोधात तळा पोलीस ठाण्यात गु.र.नं.०९/२०२१, भा.द.वि.स कलम ३५४, ३२३, ५०४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास पो.नि. गेंगजे यांच्या मार्गदर्शनाखाली एस.ए.जगधने करीत आहेत.