पेण आरटीओचे हप्तेखोर वाहतूकदारांना अभय तर सर्वसामान्य वाहतूकदारांवर कारवाईचा बडगा!
पेण आरटीओ कार्यालयातील भ्रष्ट कारभाराविरूद्ध आंदोलन छेडणार
सामाजिक कार्यकर्ते यशवंत घासे यांचा आरोप
रायगड (समीर बामुगडे) : भ्रष्टाचाराचे कुरण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पेण आरटीओ कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी हप्ता देणाऱ्या ओव्हरलोड वाहतूकदारांना अभय देत असून सर्वसामान्य वाहतूक दारांवर कारवाईचा बडगा उगारून या वाहतूक दारांचे आर्थिक कंबरडे मोडत असल्याने रायगड जिल्ह्यातील वाहतूकदारात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. सर्वसामान्य वाहतूकदारांना त्रास देणाऱ्या पेण आरटीओ अधिकाऱ्यांच्या विरोधात हे वाहतुकदार रस्त्यावर उतरणार आहेत असा इशारा पेण येथील व्यावसायिक व अपंग संघटनेचे पदाधिकारी यशवंत घासे यांनी दिला आहे.
औद्योगिक जिल्हा म्हणून ओळख असलेल्या रायगड जिल्ह्यात मुंबई-गोवा तसेच मुंबई -पुणे हे दोन राष्ट्रीय महामार्ग येत आहेत. या दोन्ही महामार्गावरून दररोज हजारो वाहनांची वर्दळ सुरू असते. या मार्गावरून मोठ्या प्रमाणात टँकर, ट्रक, डंपर, ट्रेलर अशा वाहनांतून रोड वाहतूक सुरू असते. अनेक वाहने टॅक्स न भरताच रस्त्यावरून बिनधास्तपणे धावत असतात तसेच अनेक वाहने त्यांच्या क्षमतेपेक्षा दुप्पट-तिप्पट मालवाहतूक करत असतात. मात्र या ओव्हरलोड वाहतूकदारांवर दंडात्मक कारवाई करण्याचे सोडून सर्वसामान्य वाहतूकदारांवर दंडात्मक कारवाई करण्याचे काम हे आरटीओचे अधिकारी करत असल्याचे यशवंत घासे यांनी म्हटले आहे.
पेण येथील अपंग व्यावसायिक यशवंत घासे यांना पेण आरटीओ अधिकाऱ्यांच्या या मनमानी कारभाराला तोंड द्यावे लागले आहे. यशवंत घासे हे आरटीओ अधिकाऱ्यांना हप्ते देत नसल्याने त्याचा राग मनात ठेवून पेण आरटीओतील अधिकाऱ्यांनी एकाच महिन्यात त्यांच्या मालवाहतूक गाड्यांवर कारवाई केली. एका गाडीवर एकदा दंडात्मक कारवाई केली असता, त्याच महिन्यात त्या गाडीवर कारवाई करता येत नाही असा नियम असताना अपंग व्यवसायिक यशवंत घासे यांच्या ( MH 06 BW 7300 ) या माती वाहू डंपरवर 8 मार्च 2021 रोजी कारवाई करत 27 हजार 700 रुपये दंड आकारला असतानाच एक महिन्याच्या आत पुन्हा 12 एप्रिल 2021 ला कारवाई करून 41 हजार रुपये दंड आकारण्याची बेकायदेशीर कारवाई केली असल्याचा आरोप यशवंत घासे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
आरटीओ कार्यालयातील अधिकारी व ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांचे "अर्थ" पूर्ण संबंध असून प्रत्येक तालुक्यात या ओव्हरलोड वाहतूक दादांचे एजंट नेमलेले आहेत. त्यांच्यामार्फत आरटीओ अधिकाऱ्यांना हप्ते पोहोचत आहेत असा आरोप देखील यशवंत घासे यांनी केला आहे. हप्ते देणाऱ्या ओव्हरलोड वाहतूकदारांना आरटीओ कार्यालयातील एजंट मार्फत विशिष्ट प्रकारचे 'कार्ड' दिले जातात. ज्या गाडी मालकाकडे असे कार्ड असतात त्यांच्यावर कारवाई केली जात नसल्याचे घासे यांनी सांगितले.
आरटीओ अधिकाऱ्यांची यापुढे अशीच मनमानी व भ्रष्ट कारभार राहिला तर रायगड जिल्ह्यातील सर्व अपंग संघटना एकत्र येऊन या हप्ते बहाद्दर अधिकाऱ्यांना धडा शिकवणार असा इशारा देखील सामाजिक कार्यकर्ते यशवंत घासे यांनी दिला आहे.