रोठ खुर्द सरपंचांनी पदाचा गैरवापर करत पैशाचा अपहार केल्याची तक्रार

रोहा (समीर बामुगडे) : रोहा तालुक्यातील श्रीमंत ग्रामपंचायत असा नावलौकिक असणाऱ्या रोठ खुर्द ग्रामपंचायतीमध्ये सरपंच गिता जनार्दन मोरे आणि ग्रामसेवक सावंत यांनी संगनमताने लाखो रुपयांचा अपहार केल्याची तक्रार स्थानिक युवा कार्यकर्ते किरण लक्ष्मण मोरे यांनी गट विकास अधिकारी रोहा यांच्याकडे केली आहे. दरम्यान, याप्रकरणी गटविकास अधिकारी यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये सत्तांतर होऊन रोठ खुर्द ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एकहाती सत्ता येऊन गिता जनार्दन मोरे या सरपंच पदावर विराजमान झाल्या आहेत.गिता मोरे यापूर्वी देखील ग्रामपंचायत सदस्या म्हणून निवडून आल्या होत्या. ग्रामपंचायत सदस्य म्हणून कार्यरत असताना त्यांनी आपल्या शासकीय कामाचा राजीनामा देणे गरजेचे होते. पण त्यांनी शासकीय कामाचा राजीनामा न देऊन शासनाची यापूर्वी देखील फसवणूक केली आहे. सरपंच म्हणून निवड होताच त्यांनी ग्रामसेवक यांना हाताशी धरून कामाचे कोणतेही मूल्यांकन, कार्यारंभ आदेश नसताना धनादेश क्रमांक १०१६९५ याचा वापर करत नरेश लक्ष्मण मोरे यांच्या नावे दोन लाख रुपये खर्च केले असल्याचा आरोप किरण मोरे यांनी गटविकास अधिकारी रोहा यांनी केलेल्या लेखी तक्रारीत केला आहे. गटविकास अधिकारी रोहा यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेत अहवाल सादर करण्याचे आदेश सरपंच व ग्रामसेवक रोठ खुर्द यांना २२ मार्च रोजीच्या पत्राने दिले आहेत. पण ग्रामपंचायती कडून सदर प्रकरणी कोणताही खुलासा सादर करण्यात आलेला नसल्याने या प्रकरणी संशयाचे धुके निर्माण झाले आहे. गटविकास अधिकारी यांनी रोठ खुर्द ग्रामपंचायतीची दफ्तर तपासणी करून सत्य जनतेसमोर आणावे अशी प्रतिक्रीया मोरे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केली आहे. परंतु याप्रकरणी रोठ खूर्द ग्रामपंचायतीने प्रतिक्रीया देण्यास नकार दिला.

Popular posts from this blog