वीजग्राहकांनी स्वतःहून मीटर रिडींग पाठविण्याचे महावितरणचे आवाहन, दरमहा चार दिवसांची मुदत

तळा (संजय रिकामे) : वीजग्राहकांना स्वतःहून दरमहा मीटर रिडींग पाठविण्याची सोय व त्यासाठी चार दिवसांची मुदत उपलब्ध आहे. सध्या कोरोना विषाणूची दुसरी लाट सुरु असल्याने संचारबंदी आहे. तसेच अनेक भाग व सोसायट्या प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे अशा ठिकाणी महावितरणला मीटर रिडींग घेणे शक्य न झाल्यास वीजग्राहकांना मीटर रिडींग पाठविता येईल. महावितरण मोबाईल अॅप किंवा वेबसाईटद्वारे ग्राहकांनी स्वतःहून मीटर रिडींग पाठवावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. महावितरणकडून केंद्रीकृत वीजबिल प्रणाली (सेंट्रलाईज बिलिंग सिस्टीम) सुरु करण्यात आल्यानंतर प्रत्येक महिन्याच्या १ ते २५ तारखेपर्यंत एका निश्चित तारखेला लघुदाब वीज ग्राहकांकडील मीटरचे फोटो रिडींग घेण्यात येत आहे. महिन्यामध्ये रिडिंगसाठी निश्चित केलेली तारीख ग्राहकांच्या वीज बिलांवर नमूद आहे. मीटर क्रमांक देखील नमूद आहे. रिडींगच्या या निश्चित तारखेच्या एक दिवस आधी महावितरणकडून सर्व ग्राहकांना स्वतःहून रिडींग पाठविण्याची ‘एसएमएस’द्वारे दरमहा विनंती करण्यात येत आहे. हा मेसेज मिळाल्यापासून चार दिवसांपर्यंत ग्राहकांना स्वतःहून मोबाईल अॅप किंवा वेबसाईटद्वारे रिडींग पाठविता येईल. महावितरण मोबाईल अँपमध्ये ‘सबमीट मीटर रिडींग’वर क्लिक केल्यास एकापेक्षा जास्त ग्राहक क्रमांक असल्यास ज्या क्रमांकाचे मीटर रिडींग पाठवायचे आहे तो क्रमांक सिलेक्ट करावा. त्यानंतर मीटर क्रमांक नमूद करावा. मीटर रिडींग घेताना वीजमीटरच्या स्क्रिनवर तारीख व वेळेनंतर रिडींगची संख्या व केडब्लूएच (kWh)असे दिसल्यानंतरच (केडब्लू किंवा केव्हीए वगळून) फोटो काढावा.त्यानंतर फोटो नुसार मॅन्यूअली रिडींग अॅपमध्ये नमूद करावे व सबमीट करावे. मोबाईल अॅपमध्ये लॉगीन केल्यानंतर मीटर रिडींग थेट सबमीट करता येईल. मात्र गेस्ट म्हणून मीटर रिडींग सबमीट करताना नोंदणीकृत मोबाईलवर प्राप्त झालेला ओटीपी क्रमांक नमूद करावा लागेल. ज्या ग्राहकांना  www.mahadiscom.in या वेबसाईटवरून फोटो व मीटर रिडींग अपलोड करायचे आहे त्यांनी ग्राहक क्रमांका सोबत ग्राहक रजिस्ट्रेशन व लॉगीन करणे आवश्यक आहे. 

स्वतःहून मीटर रिडींग घेण्याचे फायदे अनेक - 

प्रत्येक महिन्यात केवळ दोन ते तीन मिनिटांचा कालावधी लागणाऱ्या या प्रक्रियेतून लघुदाब वीजग्राहकांनी दरमहा मीटर रिडींग व फोटो महावितरणकडे स्वतःहून पाठविल्यास अनेक फायदे होणार आहे. स्वतःच्या मीटरकडे व रिडिंगकडे नियमित लक्ष राहील. वीज वापरावर देखील नियंत्रण राहील. रिडींगनुसार बिल आल्याची खात्री करता येईल. मीटर सदोष किंवा नादुरुस्त असल्यास त्याची तात्काळ तक्रार करता येईल. वीज बिलांबाबत कोणत्याही तक्रारी उद्भवणार नाहीत.रिडींग अचानक वाढल्यास त्याची कारणे शोधता येईल. शंका समाधानासाठी तक्रार करता येईल.  इतर विविध फायद्यांमुळे वीजग्राहकांनी स्वतःहून दरमहा मीटर रिडींग पाठवावेअसे आवाहन मुख्य जनसंपर्क अधिकारी फोन क्र. 26474211 महावितरण मुंबई यांनी केले आहे.

Popular posts from this blog