रोहा पुरवठा विभागाला आली जाग
न्यूज २४ तास मराठी'च्या दणक्याने ‘लोकसेवा हक्क अधिनियमाचे फलक
रोहा (समीर बामुगडे) : रोहा तहसील कार्यालयात असलेल्या पुरवठा विभागाने नुकताच दर्शनी भागात ‘लोकसेवा हक्क अधिनियम’ चा फलक लावला. अधिनियम अस्तित्वात आल्यानंतर ६ वर्षांनी लागलेला सदर फलक पाहून नागरिकांनी आश्चर्य व समाधान व्यक्त केले.
‘स्वयंपूर्ण रायगड’च्या टीमने माहिती अधिकार, लोकसेवा हक्क अधिनियम, लोकशाही दिन याचा रायगड जिल्ह्यात प्रचार व प्रसार करण्याची चळवळ उभी केली आहे. नागरिकांना सरकार दरबारी न्याय व सन्मान मिळावा हा त्यामागचा हेतू!
रोहा पुरवठा विभागात ‘लोकसेवा हक्क अधिनियमाचा’ फलक नसल्याने, ‘स्वयंपूर्ण रायगड’ च्या कार्यकर्त्यांनी रोहा तहसीलदारांना ‘लोकसेवा हक्क अधिनियमचा’ फलक लावण्याची विनंती केली. त्यानंतर "न्यूज २४ तास मराठी" ने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले होते. तहसीलदारांनी संबंधितांना आदेश करून सदर फलक लावण्यास भाग पाडल्याने, तहसीलदारांच्या या कृतीचे नागरिकांनी कौतुक केले आहे.
या फलकामुळे, नागरिकांना आपले काम किती दिवसात होईल, हे काम करणारा अधिकारी कोण व काम वेळेत झाले नाही तर दाद कोणत्या वरिष्ठ अधिकार्याकडे मागायची याची कल्पना येईल. असे फलक सर्वत्र लागल्यास, भ्रष्टाचार संपणार नाही परंतु त्याचे प्रमाण मात्र नक्की कमी होईल !
– गौरव म्हात्रे ("स्वयंपूर्ण रायगड"चा कार्यकर्ता)