धोंडखार येथील प्रमोद म्हात्रे यांचा प्रामाणिकपणा 

हरवलेले पैशांचे पाकीट प्रामाणिकपणे परत केले!

रोहा पोलीसांतर्फे प्रामाणिकपणाबद्दल सत्कार 

रोहा (समीर बामुगडे) : माणगांव तालुक्यातील वावेदिवाळी येथील प्रणय कदम यांचे हरवलेले पैशांचे पाकीट रोहा तालुक्यातील धोंडखार येथील प्रमोद म्हात्रे यांना सापडले. मात्र त्यांनी केणताही मोह न बाळगता ते पाकीट प्रामाणिकपणे रोहा पोलीस ठाण्यात आणून दिले व प्रामाणिकपणा आजदेखील जिवंत असल्याचे दाखवून दिले. त्यानंतर पोलीसांच्या मदतीने सदरचे पाकीट प्रणय कदम यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले.

प्रमोद नारायण म्हात्रे रा. धोंडखार हे धोंडखार येथून कोकबन येथे चालले असताना त्यांना कोकबन मराठी शाळेजवळ रस्त्यावर पाकीट पडलेले दिसले. त्यांनी सदर पाकीट घेऊन पाहिले असता त्यामध्ये ३,५०० रूपये, ड्रायव्हिंग लायसन्स, गाडीचे आर बुक, पॅनकार्ड, दोन एटीएम कार्ड, आधार कार्ड असे होते. सदर पाकीटामध्ये असलेल्या ड्रायव्हिंग लायसन्सवरील मोबाईल नंबरवर त्यांनी संपर्क केला असता सदर मोबाईल नंबर हा लागला नसल्याने ते रोहा पोलीस स्टेशन येथे आले व त्यांनी सदरचे पाकीट सापडल्याबाबत रोहा पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक जितू कुथे यांना सांगितले असता पोलीस नाईक कुथे हे त्यांना पोलीस उपनिरीक्षक रवींद्र शेगडे यांचेकडे घेऊन गेले. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक श्री. शेगडे यांनी सदर पाकीटातील आधारकार्डावरील नाव पाहिले असता ते  वावेदिवाळी, ता. माणगाव येथे राहणारऱ्या प्रणय कदम यांचे आल्याचे समजल्याने त्यांनी माणगांव पोलीस स्टेशनशी संपर्क साधला व पोलीस पाटील यांच्याकडून प्रणय कदम यांचा मोबाईल क्रमांक घेऊन त्यास पाकीट हरवले आहे का याबाबत विचारणा केली असता "आज सकाळी मी माझ्या मामाच्या मुलाच्या लग्नासाठी सुपेगाव येथे आलो होतो तेव्हा माझे पाकीट हरवले" असे सांगितले. 

त्यानंतर त्यांना रोहा पोलीस स्टेशन येथे बोलावून हे पाकीट त्यांचेच असल्याची खात्री करून त्यांना त्याचे पाकीट देण्यात आले. तसेच प्रमोद म्हात्रे यांनी इमानदारीने त्यांना सापडलेले पाकीट हे पोलीस स्टेशनला आणून दिल्यामुळे उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी व पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र शेगडे यांनी पुष्पगुच्छ देऊन प्रमोद म्हात्रे यांचा सत्कार केला.

Popular posts from this blog