सानेगाव जेट्टी येथून 21 टन दगडी कोळसा चोरीप्रकरणी रोहा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

रोहा (समीर बामुगडे) :  इंडो एनर्जी जेटी सानेगाव तालुका रोहा येथून सुमारे एक लाख 47 हजार रुपये किमतीचा 21 टन दगडी कोळसा चोरीस गेला.

याबाबतीत सविस्तर वृत्त असे की, रोहा तालुक्यातील सानेगाव येथील इंडो एनर्जी जेट्टीमध्ये कार्यरत असणारे आरोपी सुपरवायझर गोपाळ जानू जोशी रा. भाले, ता. माणगाव, सुरक्षा रक्षक आकाश अशोक समिंदर रा. अष्टमी, ता. रोहा, लोडिंग मशीन ऑपरेटर विकास कुमार नंदकिशोर सिंग कौशिक रा. बिहार व ट्रक नंबर एम.04 जी.आर. 7700 वरील अनोळखी चालक इसम यांनी संगनमत करून इंडो ऍनर्जी जेट्टी मध्ये इम्पोर्टस मे. ग्रीन गोल्ड ग्लोबल रिसोर्सेस प्रायव्हेट लिमिटेड यांनी साठवणूक केलेल्या दगडी कोळसा मालातून सुमारे एकवीस टन वजनाचा एक लाख 47 हजार रुपये किमतीचा दगडी कोळसा ट्रक नंबर एम.04 जीआर 7700 मध्ये भरून गेट एन्ट्री व वजन काटा न करता चोरून विश्वास घात केला. 

सीसीटीव्ही फुटेज तपासून व सुरक्षा रक्षकांकडून माहिती घेऊन फिर्यादी मंगेश गणपत कामथे रा. नागोठणे यांच्या अर्जावरून रोहा पोलीस ठाण्यात भा.दं.वि. कलम 381, 406, 34 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सदर गुन्ह्याचा तपास रोहा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. एन. व्ही. बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक एम. डी. ठाकूर हे करीत आहेत.

Popular posts from this blog