सुधागड तालुका दुय्यम निबंधक लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात! 

20 हजारांची लाच घेताना पकडले!

रोहा (समीर बामुगडे) : पाली येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील दुय्यम निबंधक जितेंद्र पुरुषोत्तम वाईकर याला  20 हजार रुपयांची लाच घेताना आज (16 एप्रिल 2021) दुपारी 1.15 वाजता लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले.  त्याच्यासोबत हरेश संजय ठाकूर, खाजगी कर्मचारी, दुय्यम निबंधक कार्यालय पाली, महम्मद गुलाम रब्बानी इंद्रिस आशी शेख व राजेश सरदारमल राठोड या आरोपींनाही ताब्यात घेण्यात आले. 

तक्रारदार यांचे मुलाचे नावे असलेल्या पाली येथील नवीन फ्लॅटची नोंदणी करण्यासाठी दुय्यम निबंधकाने स्वत:साठी तसेच शेख व राठोडसाठी लाचेची मागणी केली व ही लाचेची रक्कम हरेश संजय ठाकूर याने स्वीकारली. रुपये 24 हजारांची मागणी केली होती,  परंतु रुपये 20 हजारांवर तडजोड झाली. 

तक्रारदाराकडे दस्त नोंदणी करण्यासाठी लाच मागितल्या प्रकरणी लाचलुचपत विभाग अलिबाग यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानुसार पोलीस उपअधीक्षक सुषमा सोनावणे, पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे, पोलीस हवालदार विश्वास गंभीर, महेश पाटील व विशाल शिर्के यांच्या पथकाने सापळा लावून आरोपींना दुय्यम निबंधकाच्या कार्यालयामध्ये ताब्यात घेतले. या कारवाईसाठी पंजाबराव उगले, पोलीस अधीक्षक, मुकुंद हातोटे अपर पोलिस अधीक्षक, लाप्रवि ठाणे परीक्षेत्र यांनी मार्गदर्शन केले. 

कोणताही शासकीय अधिकारी/कर्मचारी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजंट) कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य रकमेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमचेशी संपर्क साधावा असे आवाहन लाच लुचपत विभाग रायगड यांनी नागरिकांना केले आहे. 

या अटकेची सुधागड तालुक्यात जोरदार चर्चा असून नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.  यामुळे पालीतील स्टॅम्प व्हेंडर तसेच बिल्डर लॉबीचा काळाबाजारही उजेडात आला असून त्यांनीही या कारवाईचा चांगलाच धसका घेतल्याचे दिसत आहे.

Popular posts from this blog