भिरा पाली मार्गावरील पाटणूसच्या कुंडलिका नदीवरील पूल धोकादायक, वेळीच हालचाल न केल्यास सावित्री नदीवरील पुलासारखी दुर्घटना होण्याची शक्यता 

पाटणूस/माणगांव (आरती म्हामुणकर) : माणगांव तालुक्यातील भिरा पाली मार्गावरील पाटणूसच्या कुंडलिका नदीवरील पूल धोकादायक बनला आहे. सदरचा पूल जिल्हा परिषदच्या अखत्यारीत असून 1996-97 साली तो तयार करण्यात आला आहे. पुलाची रचना लोखंडी अँगल व नटबोल्डच्या साह्याने करण्यात आली आहे. शिवाय पुलाच्या दोन्ही बाजूला दोन-दोन अवजड स्प्रिंगा कार्यरत असून या संपूर्ण पुलाचा भार या स्प्रिंगा घेतात आणि म्हणून ज्यावेळी हा पूल तयार झाला त्यावेळी ज्या इंजिनीयरच्या देखरेखीखाली वाहतुकीसाठी खुला झाला त्याच वेळी इंजिनियरने सूचित केले की, दर 10 वर्षानी या पुलाची पेंटिंग व ग्रीसिंग करण्यात आली पाहिजे. 

परंतु पुलावरून वाहतूक सुरू होऊन 24 वर्ष पूर्ण झाली आहेत तरीही इतक्या वर्षात जिल्हा परिषदकडून एकदाही या पुलाची रंगरंगोटी झाली नाही अथवा ज्या स्प्रिंगांच्या आधारावर पूल उभा आहे त्या स्प्रिंगांनाही ग्रीसिंग करण्यात आलेले नाही. पूर्वी पूल नवीन असताना स्प्रिंगांमुळे पूल जम्प करीत असल्याची जाणीव व्हायची परंतु सद्य परिस्थितीत पुलाची जम्प करण्याची क्रिया मंद झाल्याची जाणीव होत आहे. या पुलावरून आजही मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. पालीवरून दिवस भरात एस. टी. च्या 4, 5 फेऱ्या होतात. या बसमधून शाळा कॉलेजचे विद्यार्थी व अनेक प्रवासी प्रवास करतात. या सर्वांच्या जीविताला धोका आहे. पावसाळ्यात कुंडलिका नदीला महापूर येतो तेव्हा या पुराचे पाणी पुलाच्या अँगलला स्पर्श करून जाते. 

तेव्हा येत्या पावसाळ्यापर्यंत जर या पुलाचे परीक्षण करण्यात आले नाही तर महाडच्या सावित्री नदीवरील पुला सारखी दुर्घटना होऊ शकते. तेव्हा प्रशासनाने त्वरित दखल पुलाचे परीक्षण करावे अशी या परिसरातील ग्रामस्थांची प्रमुख मागणी आहे.

Comments

Popular posts from this blog