पिकेल ते विकेल शासकीय योजनेचा तळा तालुक्यात शुभारंभ
तळा (संजय रिकामे) : मुख्यमंत्र्यांंच्या संकल्पनेतून पिकेल ते विकेल अभियानांतर्गत शेतकरी ते ग्राहक भाजीपाला विक्री केंद्राचे उद्घाटन तळा पं.स.सभापती अक्षरा कदम व शेणवली ग्रामपंचायत सरपंच निकीता गायकवाड यांच्या उपस्थितीत खांबिवली आदिवासी वाडी परिसरात कृषी अधिकारी श्री. करंजे व कृषी मंडळ अधिकारी सागर वाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली खांबिवली येथील कुलस्वामी शेतकरी गट यांनी ४.५ एकर जमीनीवर विविध प्रकारच्या भाजीपाला फळ पिके तयार करून शेणवली बस स्टाँप वर विक्री स्टाॅल उभे केले. यावेळी शेणवली ग्रामपंचायत माजी सरपंच खेळु वाजे, सदस्य गंगाराम भोरावकर, ग्रामस्थ शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेतकरी गट तयार करून भाजीपाला पिकवून थेट ग्राहकांना रोजच्या रोज ताजी भाजी मिळून रोजगार उपलब्ध व्हावा हा यामागचा मुख्य उद्देश असून कमी दरात उपलब्ध करून दिला आहे. शेतकऱ्यांनी दुधी, पालक, भेंडी, गवार, मिरची, कोथिंबीर, पडवळ, वांगी, कलिंगड, कोबी व पालेभाज्या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या पिकवून भाजी मंडई भरवून विक्री केली जात असून ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या अभियानांतर्गत दलाल कमी करून शेतकरी ते ग्राहक जोडले गेले असल्याने अधिक लाभ शेतकऱ्याला होणार असून ग्राहकालाही फायदा होणार आहे. शासनाच्या या योजनेचा लाभ शेतकरी ते ग्राहक यांना मिळत असून महिला वर्गात समाधान व्यक्त करीत आहेत. कृषी प्रधान देशात शेतकरी अभिमानाने उभा राहीला पाहिजे. यासाठी ग्रुप शेतकरी तयार करून शेतातून शहरातल्या घरापर्यंत अशा प्रकारची साखळी तयार करून शेतकरी संघटन सक्षम व्हावे ही संकल्पना मुख्यमंत्री यांनी कृषी विभागाच्या माध्यमातून प्रयत्न केला जात आहे आणि उत्तम प्रतिसाद मिळत आहे असे मार्गदर्शन तालुका कृषी अधिकारी करंजे यांनी या उद्घाटन प्रसंगी कले.