ढालघर फाटा (माणगांव) येथील जुगार क्लब कधी बंद होणार?
जुगार क्लब तातडीने बंद करण्याची महिला वर्गाची मागणी
महिला वर्ग मोर्चा काढण्याच्या तयारीत!
रायगड (प्रतिनिधी) : माणगांव तालुक्यातील ढालघर फाटा येथे बेकायदा जुगार क्लब राजरोसपणे सुरू असून पोलीस प्रशासनाने हा अवैध जुगार क्लब तातडीने बंद करण्याची कारवाई करावी अशी मागणी या परिसरातील महिला वर्गाकडून केली जात आहे.
माणगांव तालुक्यात मुंबई-गोवा महामार्गावर असलेल्या ढालघर फाटा येथील गॅरेजच्या पाठीमागील बाजूस बेकायदा जुगार क्लब राजरोसपणे सुरू आहेत. या परिसरामध्ये या बेकायदा जुगार क्लबमुळे या परिसरातील महिला वर्गामध्ये संतापाची लाट पसरली असून महिला वर्ग मोर्चा काढण्याच्या तयारीत आहे. या जुगाराच्या व्यसनाने सध्याची तरूण पीढी बिघडत चालली असून अनेकांचे संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर आलेले आहेत. सदरचा बेकायदा जुगार क्लब या परिसरात आजपर्यंत कायम सुरू असल्यामुळे या परिसरात कायदा व सुव्यस्था आहे का? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक व महिला वर्गासमोर उभा आहे.