कुंडलिका विद्यालय पाटणूस माजी विद्यार्थी आयोजित गुरुवर्य सत्कार सोहळा व शैक्षणिक साहित्य वितरण समारंभ संपन्न
32 वर्षानंतर प्रथमच एकत्र आले गुरुवर्य आणि विद्यार्थी
पाटणूस/माणगांव (आरती म्हामुणकर) : माणगांव तालुक्यातील कुंडलिका विद्यालय पाटणूस शाळेतील सन 1988, 89 व 1993 साल चे एस.एस.सी. चे माजी विद्यार्थी यांनी 3 मार्च 2021 रोजी गुरुवर्य सत्कार सोहळा व शैक्षणिक साहित्य वितरण समारंभ आयोजित केला होता. या कार्यक्रमास तीन गुरुवर्य व 50 माजी विद्यार्थी उपस्थित होते. 3 जून 2020 रोजी झालेल्या चक्री वादळात कुंडलिका विद्यालयाची इमारत व शालेय साहित्याची खूप हानी झाली होती. कुंडलिका विद्यालयाचे संस्थेचे चेअरमन, संचालक, व स्थानिक विद्यार्थी यांचे प्रयत्न कामी आले आणि टाटा पॉवर भिरा कंपनी व्यवस्थापन यांनी कुंडलिका विद्यालयाची इमारत दुरुस्त करून दिली. शाळा दुरुस्त झाली पण पावसामुळे शाळेतील बेंच, ब्लॅकबोर्ड निकामी झाले होते. ही बाब स्थानिक माजी विद्यार्थी यांनी शहरातील माजी विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आणून दिली व त्यामुळे हे माजी विद्यार्थी एकमेकांच्या संपर्कात आले आणि त्यांनी प्रथम शाळेला भेट दिली व वादळात झालेल्या शालेय साहित्याची पाहणी केली. त्याप्रमाणे शाळेला आवश्यक असलेले बेंच ग्रीनबोर्ड उपलब्ध करून दिले. त्या अनुषंगाने सर्वानी गुरुवर्य यांचा सत्कार, शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन केले.
कार्यक्रमास सर्व विद्यार्थी अगदी वेळेत हजर झाले होते. सर्व विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उल्हास जाणवत होता. नेहमीप्रमाणे अध्यक्ष निवड, दीप पूजा, ईशस्तवन, स्वागतगीत, आणि प्रास्ताविक झाल्यांनतर सर्व विद्यार्थ्यांनी माजी मुख्याध्यापक श्री. सोनवणे सर, माजी मुख्याध्यापक याद्निक सर, माजी शिक्षक दिघे सर, व व्यासपीठावरील अन्य मान्य वरांचा सत्कार करण्यात आला. तसेच 1988-89 विद्याथ्यांनी 40 बेंच शाळेला भेट दिले व 1993 च्या विद्यार्थ्यांनी 6 ब्लॅकबोर्ड शाळेला भेट दिले. श्री महालक्ष्मी मंदिर ट्रस्ट विवळ वेढे ता. डहाणू, जि. पालघर यांच्याकडून 85 डझन लॉगबुक शालेय विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले.
मनोगत व्यक्त करताना अनेक विद्यार्थ्यांनी सांगितले की, आम्ही माजी विद्यार्थी म्हणजे म्हणजे एक कुटूंब आहोत आणि इथून पुढेही जेव्हा-जेव्हा आमची शाळा संकटात असेल तेव्हा-तेव्हा आम्ही शाळेला मदत करण्यासाठी कटिबद्ध आहोत. अजूनही आमच्या 27 बॅच शिल्लक असून हे सर्व विद्यार्थी एकत्र आले तर यापेक्षाही अत्याधुनिक शाळा उभी रहायला वेळ लागणार नाही!
शाळेचे चेअरमन मन सुरेश म्हामुणकर यांनी सांगितले की, तरुण वर्ग नोकरी निमित्त बाहेर गेल्याने शाळेचा पट थोडा कमी झाला असला तरी स्पर्धेत टिकून राहण्या साठी आम्ही विळे कुंडलिका विद्यालय विना अनुदानित इंग्रजी शाळेची निर्मिती केली असून या शाळेला पालकांचे चांगले सहकार्य मिळत आहे. प्रमुख पाहुणे सोनवणे सर म्हणाले मी पैशा पाण्याने श्रीमंत असलो तरी आज माजी विद्यार्थ्यांनी जो माझा सत्कार केला त्याने मी आज खऱ्या अर्थाने श्रीमंत झालो. शाळेचे शिक्षक मुंडे सर यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.
आठवणीत राहणारा क्षण : जेव्हा सर्व विद्यार्थ्यांनी पूर्वी ज्याप्रमाणे शाळेत आल्यावर विद्यार्थी गोंधळ घालीत अगदी तसाच गोंधळ त्यांनी घातला आणि 32 वर्षांपूर्वीच्या आठवणी जागृत झाल्या. गम्मत म्हणून सोनवणे सरांनी सर्वांना शांत राहण्याचे आवाहन करताच एकाच हश्या पिकला. आणि खरोखच सर्वच विद्यार्थी शांत बसले.