१७ वर्षे देशसेवा करणाऱ्या निवृत्त भारतीय जवानाचे ग्रामस्थांकडून जंगी स्वागत
स्वागत समारंभात आमदार भरतशेठ गोगावले यांची प्रमुख उपस्थिती
पाटणूस/माणगांव (आरती म्हामुणकर) : माणगांव तालुक्यातील साजे येथील तरूण श्री. संतोष कृष्णाजी भोसले याने आर्मीमध्ये भर्ती होऊन १७ वर्षे देशसेवा केली. दि. ३१ जानेवारी रोजी तो सेवानिवृत्त झाला. त्यानंतर दि. २ फेब्रुवारी रोजी तो गावी परतला. तेव्हा त्याच्या स्वागतासाठी बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामस्थ मंडळ साजे, मित्र मंडळ साजे व विळे पंचक्रोशी यांनी सत्कार समारंभ कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमास महाड, माणगांव मतदार संघाचे आमदार भरतशेठ गोगावले हे आवर्जून उपस्थित होते.
याशिवाय राजेश मपारा (भाजपचे दक्षिण रायगड चे अध्यक्ष व पत्रकार संघाचे सचिव), माणगांवचे नायब तहसीलदार श्री. भाबड, साजे, रवाळजे, विळे पाटणूस परिसरातील लष्कर अधिकारी व निवृत्त भारतीय जवान, आजी-माजी सरपंच, आई अहिल्याबाई, भाऊ रामदास, देविदास व विष्णूदास, बहिण चंपाली, वैशाली, वृषाली व ग्रामस्थ, बंधू-भगिनी यांच्या उपस्थितीत संतोष यास भावी आयुष्याबद्दल शुभेच्छा देत आमदार भरतशेठ गोगावले म्हणाले की, १७ वर्षे देशाची सेवा करून या जवानाने आपल्या साजे गावाचे व पर्यायाने आपल्या कुटूंबाचे नाव रोशन केले आहे. एका निवृत्त आर्मी जवानाच्या स्वागत समारंभाचा असा भव्य कार्यक्रम या परिसरात पहिल्यांदाच होत असल्याने मी आयोजकांना खूप-खूप धन्यवाद देतो. कारण आपल्या देशाची सेवा अनेक जवान करीत आहेत, देशाच्या सीमेवर जीवाची बाजी लावीत आहेत. अशी सेवा करून जे जवान सेवा निवृत्त होतील त्यांचा प्रत्येक गावाने आशा प्रकारे सत्कार करायला हवा. कारण हे जवान देश्याच्या सीमेवर राहून आपले संरक्षण करतात म्हणूनच आपण आपल्या घरात सुरक्षित असतो. आपण घरात राहतो म्हणून ऊन, वारा, पाऊस, थंडी यांपासून आपले संरक्षण होते परंतु हे जवान वेळप्रसंगी ऊन, वारा, पाऊस, थंडी आणि ज्या प्रदेशात बर्फ पडतो अशा ठिकाणी आपल्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र पहारा देत असतात व अशा प्रकारे देशाची सेवा करून घरी परतलेल्या जवानाचे जल्लोषात स्वागत करणे हे आपणा सर्वांचे प्रथम कर्तव्य आहे! मी पुन्हा एकदा संतोषचे अभिनंदन करतो व त्याचे भावी आयुष्य सुख-समृध्दीचे जावो यासाठी शुभेच्छा देतो. जय हिंद! जय महाराष्ट्र! वंदे मातरम!
आमदारांच्या भाषणानंतर सूत्रसंचालक प्रसाद जाधव यांनी सर्वांचे आभार मानुन कार्यक्रम संपल्याचे जाहीर केले.