महावितरण कार्यालयासमोर भाजपाचे आंदोलन, महाविकास आघाडी सरकारचा नोंदविला जाहीर निषेध

तळा (संजय रिकामे) : राज्यात थकीत वीज बिलामध्ये सूट नाही विज बिल न भरल्यास ग्राहकांची वीज कट होणार असे आदेश महाविकास आघाडी सरकारने दिल्यानंतर महावितरण कंपनीने धडक अंमलबजावणी करण्यास सुरवात केली आहे. त्यानुसार महावितरण कंपनीने थकबाकीदारांना नोटिसा दिल्या असून ग्राहकांनी वीज बिल भरले नाही तर वीज तोडण्याची मोहीम वीज मंडळाने हाती घेतली आहे. या मुद्द्यावरून तळा तालुक्यातील भारतीय जनता पार्टी आक्रमक झाली असून आज शुक्रवार दिनांक ५ फेब्रुवारी रोजी तळा शहरातील महावितरण कार्यालयासमोर भाजपा पक्षाकडून आंदोलन करीत सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला. याबाबतचे लेखी निवेदन उप कार्यकारी अभियंता श्री. महेंद्रकर यांना देण्यात आले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे तळा तालुका अध्यक्ष कैलास पायगुडे, शहर अध्यक्ष सुधीर तळकर, महिला अध्यक्षा राजेश्री सोलम, सरचिटणीस रमेश लोखंडे, आत्माराम शेलार, युवा कार्यकर्ते रितेश मुंडे, प्रशांत सकपाळ, विलास ठसाल, गीतेश मेकडे, मंगेश सावंत आदि भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.                     भाजपा तळा तालुकाध्यक्ष कैलास पायगुडे म्हणाले की, करोना महामारी, चक्रीवादळ अशा नैसर्गिक आपत्तीने कंबरडे मोडलेले असताना सर्वसामान्य जनतेच्या  विजेची कनेक्शन कापण्याची मोहिम महाविकास आघाडी सरकारकडून राबवली जात आहे. सामन्य जनता आणि शेतकऱ्यांच्या बाबतीत असे क्रूर वागताना सरकारने आपले धोरण बदलावे. कोरोनाच्या संकटात उद्योगधंदे ठप्प असताना देशाची अर्थव्यवस्था केवळ बळीराजाने सांभाळली. अडचणीच्या काळात शेतकऱ्यांना मदत करायची सोडून त्याच्या घरावर नांगर फिरवण्याचे काम या सरकारकडून चालू आहे. आघाडी सरकारने काढलेला आदेश तात्काळ मागे घ्यावा. महावितरणाचे हे धोरण चुकीचे असून सरकारने शेतकऱ्यांच्या व सर्वसामान्य जनतेच्या हिताचा निर्णय घ्यावा असे मत तालुकाध्यक्ष पायगुडे यांनी व्यक्त केले. 

तालुक्यातील ग्राहकांना बसवलेले मीटर फाॅल्टी आहेत, नवीन मीटर घेण्यासाठी अर्ज करुन पाच सहा महीने होऊन गेले तरी मीटर बसवला जात नाही. तालुक्यात सरासरी बिल देण्याची पध्दत आहे यामुळे ग्राहकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. महावितरणाने ताबडतोब नवीन मीटर उपलब्ध करुन द्यावेत. स्वतः च्या कामात सुधारणा करावी नंतरच वीज तोडणी संदर्भात पाऊले उचलावीत. चुकीच्या मार्गाने विज कपात करण्यासाठी भाजपाचे कार्यकर्ते हरकत आणतील असेही यावेळी निवेदन देण्यास आलेल्या भाजपा कार्यकर्त्यांनी सांगितले. यावेळी तळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. गेंगजे यांच्या मार्गदर्शनाखाली महावितरण कार्यालयासमोर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. भाजपाचे हे आंदोलन शांततेत पार पडले.

Popular posts from this blog