जूनी पेन्शन योजना मिळवून देणार - ज्ञानेश्वर म्हात्रे यांचे आश्वासन

माणगांव तालुक्यातील साई हायस्कूलमध्ये जंगी स्वागत 

माणगांव (राजन पाटील) : शिक्षण क्षेत्रातील विविध समस्या सोडवण्यासाठी समर्थ असलेल्या व प्रामुख्याने जूनी पेन्शन योजना, अघोषित शाळांच्या अनुदानासाठी आग्रही भूमिका घेणाऱ्या महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे कोकण विभाग अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या शनिवार दि. ३० जानेवारी व ३१ जानेवारी या दोन दिवसांच्या दरम्यान माणगांव तालुक्यातील लोकमान्य ज्ञानदिप विद्यामंदिर साई या हायस्कूल मध्ये सभा घेण्यात आली. शाळेच्या नूतनीकरणात मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा याच दिवशी करण्यात आली होती. 

यावेळी कोकण विभाग शिक्षक सेनेचे अध्यक्ष श्री. ज्ञानेश्वर म्हात्रे, शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष श्री. रविंद्र पाटील, जूनी पेन्शन हक्क रायगडचे अध्यक्ष श्री. गजानन म्हात्रे, पेण तालुका शिक्षक सेनेचे अध्यक्ष श्री. मोकल सर, शिक्षक सेनेचे उर्दू विभाग समन्वयक श्री. काझी सर यांच्या हस्ते दिपप्रज्वलन, छत्रपती शिवाजी महाराजांच्या व राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष तथा माणगाव तालुका शिवसेना प्रमुख श्री. गजानन आधिकारी, सचिव तथा माणगाव तालुक्यातील शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष श्री. गणेश पवार, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुजाता म्हात्रे-पाटील, बोरवाडी हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. कुशिरे सर, कांदळगाव हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. दिनेश महाडिक, बोरघर-ता. तळा हायस्कूल च्या मुख्याध्यापिका सौ. चव्हाण, शिक्षक सेना माणगांव अध्यक्ष श्री. चंद्रकांत आधिकारी, जूनी पेन्शन हक्क संघटनेचे माणगांव तालुका अध्यक्ष श्री. राजन पाटील, जूनी पेन्शन हक्क संघटनेचे तळा तालुका अध्यक्ष श्री. मनोज सुतार आदी मान्यवरांसह शिक्षक सेनेचे तालुका पदधिकारी व जूनी हक्क पेन्शन संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. 

यावेळी मार्गदर्शन करताना श्री. ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी जूनी पेन्शन योजना लागू होण्यासाठी पुरक असणारी अधिसूचना रद्द करण्यात आपण यशस्वी झालो आहोत. पण यावर अवलंबून न राहता जूनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी आपण सरकारला भाग पाडू यासाठी आपण प्रयत्नशील राहू असे आश्वासन दिले. त्याचबरोबर अनुदानासाठी प्रलंबित असणाऱ्या अघोषित शाळांना अनुदान मिळवून देण्यासाठीही आपण कटीबद्ध आहोत असेही सांगितले. 

यावेळी जूनी पेन्शन योजना रायगड चे अध्यक्ष श्री. गजानन म्हात्रे यांनीही आपण जूनी पेन्शन योजना मंजूर करून घेऊ असे आश्वासित केले. माणगांव तालुका जूनी पेन्शन संघटनेचे अध्यक्ष श्री.राजन पाटील सर यांनी आमचे पी.एफ. कपात सूरळीत व्हावी व त्या पी.एफ. कपातीच्या पावत्या आम्हाला दरवर्षी मिळाव्या, त्याचा हिशोब द्यावा अशी इच्छा व्यक्त करुन येत्या १२ जानेवारी रोजीच्या जनता दरबारात शिक्षणाधिकारी (माध्यमिक) व वेतन पथक अधिक्षीका यांना धारेवर धरावे असे सूचविले. यावेळी मुख्याध्यापक कुशिरे सर यांनीही आपले विचार मांडले. कार्यक्रमासाठी माणगांव, तळा व म्हसळा  तालुक्यातील अनेक शिक्षक आपले प्रश्न मांडण्यासाठी हजर होते. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रबद्ध सूत्रसंचालन शाळेचे शिक्षक श्री. विदयाधर जोशी यांनी केले. तर आभार प्रदर्शन माणगांव तालुका शिक्षक सेनेचे अध्यक्ष श्री. चंद्रकांत आधिकारी यांनी केले. यावेळी महिला शिक्षिका भगिनींची उपस्थिती प्रशंसनीय होती.

Popular posts from this blog