देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्य उपस्थित शिवसेनेचा ढाण्या वाघ रवीभाऊ मुंढे भाजपात दाखल
महाआघाडी समोर भाजपाचे कडवे आव्हान!
तळा (संजय रिकामे) : श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात प्रभावी असलेले शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख रवीभाऊ मुंढे यांनी मंगळवारी आपल्या कार्यकर्त्यांसह विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईत भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, आ. रविंद्र चव्हाण, आ. गिरीश महाजन, आ. आशिष शेलार, आ. मंगलप्रभात लोढा, आ. निरंजन डावखरे, रायगड जिल्हा अध्यक्ष ॲड. महेश मोहीते, तळा तालुका भाजपा अध्यक्ष कैलास पायगुडे, शहर अध्यक्ष सुधीर तळकर, ॲड. निलेश रातवडकर आदी मान्यवर उपस्थित होते. मुंढेंच्या भाजप प्रवेशामुळे रायगड जिल्हा शिवसेनेला हा मोठा हादरा मानला जात असुन आगामी निवडणुकीत भाजपा महाआघाडी समोर कडवी झुंज देणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या पक्ष प्रवेशामुळे रायगड जिल्ह्यात भाजपाचे वर्चस्व वाढणार असल्याचे बोलले जात आहे.
ऐन निवडणूक काळात मुंढेंच्या निर्णयामुळे शिवसेनेला मोठा हादरा आहे. मुंढे यांनी मागील विधानसभा निवडणुकीत श्रीवर्धन मतदारसंघातून 60961 मते मिळवत राष्ट्रवादीचे माजी आमदार अवधुत तटकरे यांना घाम फोडला होता. केवळ 77 मतांनी त्यांचा पराभव झाला होता. रायगड जिल्ह्यात भाजपाकडे आकर्षित होणाऱ्या नेत्यांची संख्या वाढत चालली आहे. त्यात मंगळवारी शिवसेना माजी जिल्हाप्रमुख रवीभाऊ मुंढे यांचाही समावेश झाला. रायगड जिल्ह्यात रवीभाऊ मुंढे यांना ताकद देण्याचे आश्वासन विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः दिले असल्याने नक्कीच रायगड जिल्ह्यात परिवर्तनाची लाट पहायला मिळेल असा विश्वास रवीभाऊ मुंढे यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
नगराध्यक्षा सौ.रेश्मा मुंढेसह राष्ट्रवादी काँग्रेस दिग्गज नेत्यांचा भाजपात जाहीर प्रवेश
तळा नगरपंचायतीच्या विद्यमान नगराध्यक्षा सौ.रेश्मा मुंढे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही दिग्गज नेत्यांनी भाजपात प्रवेश केला विधानसभा निवडणुकीपुर्वी शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख विजय तांबे, आणि विलास ठसाळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. आज भाजपा नेतृत्वावर विश्वास दाखवत त्यांनी रवीभाऊ मुंढे यांच्यासोबत भाजपात प्रवेश केला. ज्ञानेश्वर घरटकर, विशाल मुंढे, सुभाष मुंढे, रविंद्र शिगवण, चेतन चोरगे, रितेश मुंढे, सागर मुंढे यांनी देखील भाजपात प्रवेश केला आहे.
तळा नगरपंचायतीवर भाजपाची पकड मजबूत
कोरोना व्हायरसमुळे लांबणीवर पडलेल्या तळा नगरपंचायत निवडणुकीतील वातावरण पुन्हा एकदा तापण्यास सुरवात झाली आहे. महाआघाडीच्या गडाला सुरुंग लावत शिवसेना माजी जिल्हाप्रमुख भाजपात दाखल झाले आहेत. तळा नगरपंचायतीत रवी मुंढे यांच्या पत्नी रेश्मा मुंढे या नगराध्यक्षा आहेत. मागील नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेने रवीभाऊ मुंढे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसला धूळ चारत शिवसेनेची सत्ता आणली. शहरातील पाणी पुरवठा योजना तसेच विविध विकासकामे त्यांनी पाठपुरावा करुन मंजुुुर करुन आणली. परंतु स्वपक्षातील नगरसेवक विकासकामांसाठी विरोध करत असून ठेकेदाराकडून कामाच्या मोबदल्यात टक्केवारी मिळविण्यासाठी धडपडत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. नगरसेवक खंडणीखोर असून तालुका प्रमुख केवळ विकासकामांचे कंत्राट घेण्यासाठी आले असल्याचाही आरोप त्यांनी त्यावेळी केला. पक्ष संघटनेची बदनामी होत असून ग्रामीण आणि शहरी भागातील शिवसैनिक पक्षापासून लांब होत चालला असल्याचा गंभीर आरोप मुंढे यांनी पत्रकार परिषद घेऊन केला होता. आज अखेर त्यांनी भाजपात प्रवेश केला असल्याने तळा नगरपंचायतीवर भाजपाची पकड मजबूत झाली असून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात चिंतेचे वातावरण पसरले आहे.
राज्यातील राजकीय समिकरणे आता बदलली आहेत. शिवसेनेने भाजपाला बाजूला सारत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत हातमिळवणी करत सत्ता काबीज केली आहे. यामुळे रायगड जिल्ह्यातील चित्र पालटू लागले आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यापासून दूर होत नेत्यांनी भाजपात जाणे पसंत केले आहे. रायगड जिल्ह्यात आगामी नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस हे तीन पक्ष एकत्रित लढणार असले तरी भाजपा पूर्ण ताकतीने या निवडणुका लढणार असल्याचे या पक्ष प्रवेशामुळे सिद्ध होत असून महाआघाडीला त्यांच्या बालेकिल्ल्यात कडवे आव्हान उभे राहणार आहे.