छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण संस्थेच्या रायगड विभागीय वक्तृत्व स्पर्धा उसर हायस्कूल येथे संपन्न
माणगांव (राजन पाटील) : विद्यार्थ्यांना आपले विचार व्यक्त करता यावेत, त्यांच्या अंगी सभाधीटपणा बनावा, भविष्यात आपल्या जीवनात नेतृत्वाची दिशा मिळावी याकरिता छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण संचलित सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधून विभागवार व नंतर संस्था स्तरावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती दिनानिमित्त वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन केले जाते.
यावर्षी संस्थेच्या अभिनव ज्ञान मंदिर उसर खुर्द ता. तळा या प्रशालेत इयत्ता आठवीसाठी निरोगी शरिरासाठी व्यायामाचे महत्त्व, इयतत्ता नववीसाठी रोगप्रतिकारक शक्ती व आरोग्यदायक सवयी तर इयत्ता दहावीसाठी ऑनलाईन शिक्षण-अनुभव अशा विषयावर वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन केले होते. या स्पर्धेचे उद्घाटन शाळेचे मुख्याध्यापक श्री. बाळासाहेब दुधाळ यांच्या हस्ते व परिक्षक श्री. विद्याधर जोशी व श्री. हेमंत बारटक्के यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
या स्पर्धेत इयत्ता आठवीमधून प्रथम क्रमांक नेत्रा विनोद फराड (रातवड हायस्कूल) तर द्वितीय क्रमांक भूमी हरिश्चंद्र धुमाळ (वडघर हायस्कूल) इयत्ता नववीमधून प्रथम क्रमांक सारिका बाळाराम दिघे (वाघेरी हायस्कूल) तर द्वितीय क्रमांक आयुष्का विकास यादव (रातवड हायस्कूल), इयत्ता दहावी प्रथम क्रमांक सार्थकी गणेश सकपाळ (उसर हायस्कूल) तर द्वितीय क्रमांक सानिया दगडू भोस्तेकर (उसर हायस्कूल) या विद्यार्थ्यांनी मानांकन प्राप्त केली. सदर स्पर्धांचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन श्री. दिपक गुजर यांनी केले. यशस्वी स्पर्धकांचा मान्यवर परीक्षक श्री. विद्याधर जोशी, हेमंत बारटक्के व शाळेचे मुख्याध्यापक श्री. बाळासाहेब दुधाळ सर यांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरव करण्यात आला.