रायगड विकास प्राधिकरणात अंतर्गत वाद?
प्राधिकरणाच्या पत्रकार परिषदेत सदस्यांची अनुपस्थिती!
पुरातत्व विभागाची परवानगी न घेताच नवीन रोप वे ची घोषणा!
माणगांव (राजन पाटील) : आस्तित्वात असलेला रोप वे सुरक्षित असताना, अपेक्षित असणाऱ्या सुधारणा होणे शक्य असताना, तसेच पुरातत्व विभागाची कोणतीही परवानगी न घेताच प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार संभाजीराजे यांनी दुसरा रोप वे तयार करण्याचा मानस पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
आस्तित्वात असलेला रोप वे हा कोणत्याही प्रकारचा अपघात न होता सुस्थितीत सुरू (कोव्हीड कालावधी वगळता) आहे. पण तरीही रायगड विकास प्राधिकरणाने त्या रोप वे मध्ये अधुनिक सुविधा वाढविण्यासाठी उपाययोजना करण्याऐवजी ५० कोटींच्या निधीचा चुराडा करण्याचा घाट का घातला आहे? यामागे प्राधिकरणाचा नेमका हेतू काय आहे? असे प्रश्न उपस्थित झालेले आहेत! याआधीच गडावरील हत्ती तलावाच्या निकृष्ठ कामामुळे ऐन ऑक्टोबर महिन्यातच तलाव कोरडा पडला. हा प्रकार शिवप्रेमींनी प्रत्यक्ष पाहिलेला आहे. मात्र प्राधिकरणाचे अध्यक्ष खा. संभाजीराजे यांनी जुलै महिन्याच्या १० तारखेला "हत्ती तलाव ओव्हरफ्लो झाला आहे!" अशा प्रकारचे वृत्त अनेक वृत्तपत्रांत प्रसिद्ध केले होते व त्यानंतर "५०-६० वर्षांमध्ये हत्ती तलावात जेवढे पाणी भरले नव्हते, तेवढे प्राधिकरणाच्या कामामुळेच भरले!" परंतु हे हत्ती तलाव फक्त पावसाळ्याच्या दिवसांतच भरलेले असते व पावसाळा संपला की कोरडे पडते हे कदाचित संभाजी राजेंना माहिती नसावे.
विशेष म्हणजे रायगड विकास प्राधिकरणाच्या पत्रकार परिषदेत प्राधिकरणाच्या अध्यक्षांव्यतिरीक्त पदसिद्ध सदस्यांची अनुपस्थिती दिसून आली. यामागचे गौडबंगाल काय? रायगड विकास प्राधिकरणातील अन्य पदसिद्ध सदस्यांचा प्राधिकरणाच्या या कारभाराला विरोध आहे का? की प्राधिकरणाच्या अध्यक्षांचा हा मनमानी कारभार आहे? असे प्रश्न शिवप्रेमी व जनसेवा संघटनेचे अध्यक्ष अॅड. अनिकेत ठाकूर यांनी उपस्थित केलेले आहेत. तसेच नवीन रोप वे ची घोषणा करण्यापूर्वी भारतीय पुरातत्व विभागाची परवानगी घेतलेली नसून केेवळ भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून शिवप्रेमींचे लक्ष विचलीत करण्यासाठी त्यांनी ही घोषणा केली असल्याचा थेट आरोप शिवप्रेमी व जनसेवा संघटनेचे अध्यक्ष अॅड. अनिकेत ठाकूर यांनी केला असून लवकरच महाराष्ट्रातील शिवप्रेमी, कार्यकर्त्यांची मोर्चेबांधणी करून रायगड विकास प्राधिकरणाच्या विरोधात आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.