शिक्षण,आरोग्य व समाजाला नवसंजीवनी देणारा कृष्णसखा : कृष्णा महाडीक
माणगांव (राजन पाटील) : अन्न, वस्त्र, निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत. पण याचबरोबर या संगणकाच्या युगात आरोग्य, शिक्षण व वीज हीसुद्धा तितकीच महत्त्वाची माणसाची गरज निर्माण झाली आहे. अर्थात प्रत्येक व्यक्ती अथवा संस्था आपआपल्या स्वकर्तृत्वाने हे सर्व निर्माण करत असतो. पण प्रतिकूल परिस्थितीमुळे अडणारे शिक्षण, आंतरिद्रीयातील बिघाडामुळे निर्माण झालेले रोग, अस्तित्वात असलेले वीज व्यवस्थेचे नुतनीकरण तत्सम सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तीच्या माध्यमातून मदत मिळवून देऊन शिक्षण, आरोग्य व समाजाला नवसंजीवनी देणारा कृष्णसखा अर्थात समाजाचा देवदूत रायगड भूषण कृष्णा महाडीक होय! त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकण्याचा हा एक छोटासा प्रयत्न.
कोविड -१९ च्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने लॉकडाऊन जाहीर केल्याने समाजातील वंचित समाज, देहविक्री करणाऱ्या स्त्रियांना त्या काळात १५ कि.ग्रॅ. अन्न धान्य वाटप करणे, रक्तदान शिबीर आयोजित करून ७५०० रक्त पिशव्यांचा संचय करुन हॉस्पिटलमधील विविध रुग्णांना जीवदान देणे, डायलिसिसच्या रूग्णांना संजीवनी देण्यासाठी डायलिसीस मशीन हॉस्पिटलमध्ये देणे, कोरोना कालावधीत मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये १कोटी, पंतप्रधान सहायता निधीमध्ये ५ कोटी व राज्यपाल सहायता निधीमध्ये १कोटीचा निधी दानशूर व्यक्तीच्या माध्यमातून मदत करणारे कृष्णा महाडीक हे मुंबईतील जीवन प्रबोधीनीकडून त्यांचा "कोरोना योद्धा" या पुरस्काराने सन्मान झाल्याने या सन्मानाची उंची वाढली आहे.
याच बरोबर शिक्षण व आरोग्य ही महत्त्वाची गरज ओळखून मुंबईतील अनेक रूग्णांच्या उपचारासाठी तसेच त्यांची देखभाल करण्यासाठी राहणाऱ्या लोकांची भोजनाची व्यवस्था करणे तसेच रायगड जिल्ह्यात ३ जून रोजी निसर्ग चक्रीवादळ झाले. या निसर्ग चक्रीवादळात अनेक शाळांचे अतोनात नुकसान झाले. यावेळी मुंबईतील दानशूर व्यक्तीच्या सहाय्याने रायगड जिल्ह्यातील अभिनव ज्ञान मंदिर उसर खुर्द, माध्यमिक विद्या मंदिर रातवड, गो.म. वेदक विद्यामंदिर तळा, माध्यमिक विद्यालय पढवण, ज्ञानदिप विद्या मंदिर बोरघर, अशोक ल. लोखंडे विद्यालय पिटसई, लोकमान्य ज्ञानदिप विद्यालय साई, सरस्वती विद्या मंदिर वडघर मुद्रे, स्वातंत्र्यवीर सावरकर विद्यालय निवी, डॉ. प्रभाकर जोशी माध्यमिक विदयालय पन्हेळी, रा. जि. प. उर्दू तळा, घोसाळकर माध्यमिक विद्यालय खामगाव, उर्दू हायस्कूल तळा, पी.एन.पी. संस्थेच्या पास्टी हायस्कूल, संदेरी हायस्कूल, द. ग. तटकरे माध्यमिक विदयालय रोहा, वडवली हायस्कूल, न्यू इंग्लिश स्कूल म्हसळा, ना. म. जोशी विद्यालय गोरेगाव, द. ग. तटकरे विद्यालय भालगाव, माणगाव तालुक्यातील सांगी आदिवासी वाडीवरील अंगणवाडी सुविधा, दहिवली, बोरीचा माळ येथे स्मशानभूमी, अंतर्गत पेव्हर ब्लॉक रस्ता, बोरीचा माळ जिल्हा परिषद शाळेत बेंचेस उपलब्ध करणे, वांजळोशी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य भेट तसेच तळा तालुक्यातील अन्य जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप करून शिक्षणाला नवसंजीवनी दिली आहे. माध्यमिक शाळांमध्ये इमारत दुरूस्ती, पाणी व्यवस्था, वीज व्यवस्था, रंग रंगोटी करणे, छप्पर दुरुस्ती आदी सुविधा अग्रस्थानी मानून समाजातील दानशूर व्यक्तीच्या माध्यमातून शाळांना दिली जाते.
मुळचे बोरीचा माळ, ता.तळा, जि.रायगडतील हे कृष्णा महाडीक हे संघ संस्कारात वाढल्याने मुंबईच्या नाना पालकर केंद्रात सेवा करतात. अतिशय सर्वसामान्य कुटूंबात जन्माला आलेले हे व्यक्तीमत्व मितभाषी, कनवाळू नेतृत्वामुळे रायगड जिल्ह्यातील जनसामान्यांचा आधार बनले आहेत. अशा या बहुआयामी व्यक्तीमत्वाला व त्यांच्या हिमालयासारख्या कार्याला आमच्या शतशः शुभेच्छा!