खैर तस्करीला वरदहस्त कोणाचा? नागरिकांचा सवाल
रोहा (समीर बामुगडे) : वनविभागाने तालुक्यात होणाऱ्या खैर तस्करी चा पर्दाफाश केला असून दि. २७ ऑक्टोबर २०२० रोजी केलेल्या कारवाईत वाहनासह जप्त केलेला खैर हा मुरुड तालुक्यातील संरक्षित जागेतून कत्तल केलेला असल्याचे बोलले जात आहे. ही कत्तल अधिकाऱ्यांच्या संगनमताने तर झाली नाही ना? असा संशय व्यक्त होत असून हा प्रकार म्हणजे कुंपणानेच शेत खाण्यासारखा असल्याचे बोलले जात आहे. वनराईचे रक्षण करण्याची जबाबदारी ज्या अधिकाऱ्यांवर आहे तेच अधिकारी केवळ अर्थपूर्णरित्या संरक्षित जंगलातील खैरांच्या बेसुमार कत्तलीकडे दुर्लक्ष करत असतील तर हे निश्चितच दुर्दैवी मानले जात आहे.
सदर प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार आरोपी गाडी मालक चालक नीरज जयस्वाल व आरोपी अमित शेळके यांना जामीन मंजूर झाला असून मुख्य आरोपी कृपेश हरिश्चंद्र चव्हाण हा फरार आहे. त्याला पकडण्यात वनविभागाला अजून यश आले नाही. सदर प्रकरणातील मुख्य आरोपी याला पकडल्यावर आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मुरुड तालुक्यात होणाऱ्या तस्करीची चर्चा रंगली असून याला वरदहस्त कोणाचा? असा सवाल नागरिकांतून विचारला जातो आहे.