चक्रीवादळात संपूर्ण घर कोसळले, माणगांव येथील नुकसानग्रस्त कुटूंब मदतीपासून वंचित
माणगांव (प्रतिनिधी) : निसर्ग चक्रीवादळामुळे असंख्य नागरिकांच्या घरांचे नुकसान झालेले; तर अनेक कुटूंब बेघर झालेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये शासनातर्फे आलेला मदतनिधी अनेक नुकसानग्रस्त कुटूंबापर्यंत अद्यापही पोहोचलेला नाही.
हे गैरप्रकार लपविण्यासाठी माणगांव तहसिल कार्यालयातर्फे एका वृत्तपत्रांत दिशाभूल करणारी व खोटी बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यामध्ये "माणगांव तहसिल कार्यालय हे मदतनिधी वाटपात अव्वल" असल्याचे खोटे व हास्यास्पद वृत्त छापून आले होते. परंतु प्रत्यक्षात मात्र मदतनिधी वाटपामध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचे उघडकीस आलेले आहे. ज्यांचे काहीच नुकसान झालेले नाही त्यांना १ लाख ६० हजारांचा मदतनिधी पोहोचविण्याचा प्रताप माणगांव तहसिल कार्यालयाने केलेला आहे. परंतु प्रत्यक्षात नुकसान झालेल्यांकडे मात्र शासनाने दुर्लक्षच केल्याचे दिसत आहे.
माणगांव तालुक्यातील महाराणा प्रताप नगर, नाणेरे येथील दिलीप गणपत लोखंडे यांचे तर संपूर्ण घर निसर्ग चक्रीवादळामध्ये जमीनदोस्त झाले. संपूर्ण घराचे नुकसान झाले. घरावरील पत्रे, लोखंडी अँगल, खिडक्या, दरवाजे, यांची संपूर्ण नासधूस झाली. यामध्ये सुमारे २ लाखांचे नुकसान झालेले आहे.
त्यानंतर सदर नुकसानीनंतर मदतनिधी मिळणेकामी रितसर पंचनामा देखील करण्यात आला. परंतु त्यानंतर दिलीप लोखंडे फक्त रू. २९ हजारांचा मदतनिधी मिळाला. पण उर्वरित रक्कम अद्यापही मिळालेली नाही. आमची परिस्थिती गरीब असल्यामुळे वादळाच्या तडाख्यात जमीनदोस्त झालेले घर पुन्हा पूर्ववत उभे करणे शक्य नसल्याने आम्हास तातडीने मदतनिधी मिळावा अशी मागणी दिलीप लोखंडे यांनी जिल्हाधिकारी रायगड व माणगांव तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.