माणगांवच्या गजानन महाराज नगरमधील कुटूंब नुकसानभरपाईपासून वंचित
भरपाई मिळू नये म्हणून यादीतील नावांमध्ये खाडाखोड, पंचनामा करणाऱ्या शिक्षीकेचा प्रताप.!
नायब तहसिलदार म्हणतात 'तुम्हाला भरपाई मिळणार नाही, मी काहीच करू शकत नाही!'
माणगांव (प्रतिनिधी) : निसर्ग चक्रीवादळामुळे असंख्य नागरिकांच्या घरांचे नुकसान झाले; तर अनेक कुटूंब बेघर झाले. त्यानंतर शासनातर्फे पंचनामे होऊन संबंधित कुटूंबांना नुकसानभरपाई मंजूर करण्यात आली. परंतु आजदेखील अनेक कुटूंब नुकसानभरपाई मिळण्यापासून वंचित राहिलेली आहेत. असाच प्रकार माणगांवच्या गजानन महाराज नगर, नाणोरे येथे घडलेला असून निसर्ग चक्रीवादळामध्ये येथील सौ. ज्योती मंगेश मेस्त्री यांच्या घराचे नुकसान झाल्यानंतर येथील पोलीस पाटील भरत पाटोळे व शालेय शिक्षीका सौ. डोळस मॅडम यांनी शासनाच्या वतीने पंचनामा केला होता. त्यानंतर सदर पंचनामा याच परिसरातील प्राथमिक शिक्षीका सौ. संजिवनी संदीप नागे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला. मात्र येथे एक विचीत्र प्रकार घडला असून पंचनामा करून तयार करण्यात आलेल्या यादीतील नावे खाडाखोड करून गायब करण्यात आल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आलेली असून माणगांवचे नायब तहसिलदार यांनी तर या गैरप्रकाराकडे दुर्लक्षच केलेले असून "मी यामध्ये काहीच करू शकत नाही, तुम्हाला नुकसानभरपाई मिळणार नाही." असे स्पष्ट व बेजबाबदारपणाचे वक्तव्य पत्रकारांसमोरच केल्याने यामध्ये काहीतरी गौडबंगाल असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी या गंभीर प्रकाराची तातडीने दखल घेऊन नुकसानग्रस्त कुटूंबांना न्याय मिळवून द्यावा व याप्रकरणातील दोषी असलेल्या शिक्षक व शासकीय कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी नुकसानग्रस्त कुटूंबांकडून करण्यात आली आहे.